रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांमधील लॉकर्सबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

लिस्टिकल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांमधील लॉकर्सबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

बोभाटा नेहमीच आपल्या वाचकांना बँक आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी बदललेल्या नव्या नियमाविषयी महत्वाची माहिती देत असतो, जेणेकरून बँक किंवा अशा ठिकाणी ग्राहकांची कुठलीही गैरसोय-फसवणूक होऊ नये. RBI ने लॉकर्ससंदर्भात काही नवे नियम केले आहेत. हे नियम १ जानेवारी २०२२ पासून देशभर लागू होणार आहेत. हे नियम काय आहेत याविषयी माहिती करून घेऊयात.

बहुतांश वेळा घरात दागदागिने किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू ठेवणे हे सुरक्षित नसते. यासाठी बँकेच्या लोकर्सचा उपयोग केला जातो. त्यामध्ये आपल्या वस्तू, कागदपत्रं ठेवल्यास काही चिंता नसते. पण आजकाल बँका ज्याप्रमाणे बंद पडतात किंवा काही अपघात घडतात त्यामुळे आपले लॉकर्सही सुरक्षित आहेत की नाही याबाबत संशय येतो. नवे बॅंक लॉकर मिळणे ही फार अवघड गोष्ट असते. अनेक वर्षे वाट पाहूनदेखील ग्राहकांना त्यांचे बॅंकेचे लॉकर उपलब्ध होत नाहीत. या समस्येवर उत्तर शोधण्यासाठीच हे नवे नियम महत्वाचे ठरणार आहेत.

यानुसार बॅंक लॉकरसंदर्भात ग्राहकांना पारदर्शकरित्या माहिती दिली जाईल. ग्राहकांना लॉकरसाठीची वेटिंग लिस्ट दिली जाईल. बॅंकेच्या कोअर बॅंकिंग सिस्टमला शाखानिहाय लॉकर दिलेली यादी आणि लॉकरसाठीची वेटिंग लिस्ट जोडली जाणार आहे. याशिवाय बॅंक आता त्यांच्या नॉन बॅंकिंग ग्राहकांनादेखील केवायसी प्रक्रिया पूर्ण करून लॉकर देऊ शकणार आहेत. यापुढे लॉकरच्या भाड्यासाठी टर्म डिपॉझिट घेण्याचा अधिकार बॅंकेला असणार आहे.

दुसरा महत्वाचा बदललेला नियम म्हणजे लॉकरमधील सामानाच्या चोरीसंदर्भात नुकसानभरपाई मिळणार आहे.
त्याअंतर्गत आग, चोरी, इमारत कोसळण्यासारखे अपघात किंवा बँकेच्या कर्मचाऱ्याकडून फसवणुकीचा प्रकार झाल्यास बँकेचे दायित्व हे लॉकरच्या वार्षिक भाडय़ाच्या १०० पट असणार आहे. लॉकरमधील सामग्री गहाळ झाल्याबद्दल अथवा गमावल्याबद्दल बँका जबाबदारी झटकू शकणार नाही. म्हणजेच सध्या काही बॅंका १,५०० रुपयांपासून ते ९,००० रुपयांपर्यतचे भाडे लॉकरच्या आकारानुसार घेतात. हे वार्षिक स्वरुपात असते. काही गडबड झाल्यास, नव्या नियमांनुसार बॅंकेला १.५ लाख रुपयांपासून ते ९ लाख रुपयांपर्यतची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. आतापर्यत लॉकरसंदर्भात ग्राहकांना कोणतीही नुकसान भरपाई देण्याची तरतूद नव्हती.

लॉकरच्या वापराबाबात ही पारदर्शकता आल्याने बॅंकेत लॉकर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी किंवा ज्यांची खूप जुने लॉकर्स आहेत, त्यांच्यासाठी आरबीआयचे नवे नियम ही एक खूशखबर आहे. अर्थात त्यासाठी बँका भाडे वाढवतात की अजून काही वेगळा आकार लावतात हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल

शीतल दरंदळे