दिवाळीच्या बरोबर आधी महागाई भत्त्यात वाढ करून सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीचे बक्षिस दिले आहे. मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नव्या सुधारणेसह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा ३१ टक्के झालेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईची झळ कमीतकमी बसावी यासाठी हा महागाई भत्ता दिला जातो. कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक पगारासोबत इतरही अनेक सुविधा मिळतात. मेडिकल भत्ता आणि इतर सुविधा असतात त्यातच महागाई भत्त्याचाही समावेश होतो.
महागाई भत्ता हा पगाराच्या काही टक्के दिला जातो. रोजच्या रोज वाढणारी महागाई आणि बदलणारे राहणीमान यांचा विचार करून हा महागाई भत्ता ठरतो. ग्रामीण भाग आणि शहरी भाग यात राहणीमान आणि खर्चात मोठा फरक होतो. या सर्व कारणांचा विचार करून पगाराव्यतिरिक्त महागाई भत्ता देण्यात येतो. याची टक्केवारी सरकारकडून कमी जास्त केली जाते.



