त्याची शाळेतील प्रगती पाहून त्याच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की तो एकतर तुरुंगात जाईल किंवा कोट्याधीश होईल. त्याला एडीएचडी (Attention-deficit/hyperactivity disorder) म्हणजे चित्त एकाग्र न करता येणे, अतिक्रियाशीलता आणि आवेगपूर्ण वर्तन अशा समस्या होत्या. त्याच्या नव्या विमान कंपनीच्या एकुलत्या एका विमानाच्या इंजिनात पक्षी घुसले आणि पहिले उड्डाण अयशस्वी झाले. कोकाकोलाचं मार्केट घेण्यासाठी त्याने बनवलेला कोला अगदीच 'पानी कम' निघाला. हाॅट एअर बलूनमधून जगप्रवास त्याच्या जीवावर बेतला. त्याचा ऑनलाईन कार बिझनेस सुरू झाला आणि लगेच बंद पडला. त्याचा डिजिटल प्लॅटफॉर्म 'ॲपल' बरोबर स्पर्धा करू शकला नाही. त्याच्या डोक्यात एका मागोमाग एक अशा भन्नाट कल्पना येत असत, पण त्या साकार व्हायच्या आधीच अयशस्वी होत होत्या.
ही गोष्ट आहे सर रिचर्ड चार्ल्स निकोलस ब्रॅन्सन यांची. त्यांचा जन्म १८ जुलै १९५० रोजी ब्लॅकहीथ, लंडन येथे झाला. त्यांची आई इव्ह ब्रॅन्सन ही माजी बॅले डान्सर व एअर होस्टेस होती आणि त्यांच्या वडिलांचं नांव एडवर्ड जेम्स ब्रॅन्सन बॅरिस्टर होतं. लिंडी ब्रॅन्सन आणि व्हेनेसा ब्रॅन्सन या त्यांच्या दोन लहान बहिणी. रिचर्ड ब्रॅन्सन हा एक ब्रिटिश अब्जाधीश, उद्योजक आणि व्यावसायिक मॅग्नेट आहे. १९७० च्या दशकात त्यांनी व्हर्जिन ग्रुपची स्थापना केली आणि हा ग्रुप आज विविध क्षेत्रातील ४०० हून अधिक कंपन्यांचे नियंत्रण करतो.




