१९८० ते ९० चं दशक. पंजाबसाठी दहशतीचा आणि तितकाच वेदनादायक काळ. या काळात पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान निर्मितीच्या मागणीनं रौद्र रूप धारण केलं होतं. ब्रिटन, कॅनडा या ठिकाणी राहणाऱ्या शीख समुदायानंही स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली होती. ही मागणी करण्यात अग्रेसर होती बब्बर खालसा नावाची संघटना. शिवाय सीमेपलीकडच्या देशातूनही या मागणीला उत्तेजन देणं सुरूच होतं. प्रत्येक गोष्टीला अंत असतो. तसाच याचाही झाला. पण त्याआधी या दहशतवादाने अनेकांचे जीव घेतले. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांत सिंग हे त्यातीलच एक.
बियांत सिंग यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातील पंजाबमध्ये एका लष्करी कुटुंबात झाला. सिंग यांनीही घराण्याची परंपरा पुढे सुरू ठेवली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते लष्करात भरती झाले. फाळणीनंतर त्यांचं सगळं कुटुंब कोटलीजवळच्या बिलासपूर या ठिकाणी स्थलांतरित झालं. इथेच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. बिलासपूरचे सरपंच ते पंजाब विधानसभा हा प्रवास त्यांनी दशकभरात पूर्ण केला. त्यांची ही घोडदौड पुढे तशीच सुरू राहिली. १९९२ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि मुख्यमंत्री झाले.



