भारतातील हि नदी चक्क सोन्याचे कण वाहून आणते!! कुठे आहे हि नदी?

लिस्टिकल
भारतातील हि नदी चक्क सोन्याचे कण वाहून आणते!! कुठे आहे हि नदी?

संपन्न सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आपल्या या भारत देशात कितीतरी आश्चर्यकारक आणि रहस्यमय ठिकाणे आहेत. नद्यांचाही आपल्या देशाला समृद्ध वारसा आहे. इथली प्रत्येक नदी अप्रतिम सौंदर्याने नटलेली असून प्रत्येकीचा एक आगळावेगळा इतिहास आहे. झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडीसामधून वाहणारी आणि पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणारी सुवर्णरेखा नदीही अशीच एका वेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे. या नदीच्या पाण्यात सोने सापडत असल्याची वंदता आहे, जाणून घेऊया या नदीची ही आगळीवेगळी कहाणी.

या नदीचा उगम झारखंडची होतो राजधानी रांचीपासून १५ किमी अंतरावर असणाऱ्या पिस्का/नगदी या गावातून. पावसाळ्यात या नदीच्या पत्रात उतरणे शक्य नसले तरी हिवाळ्यापासून मात्र लोकं या पात्रातील सोन्याचे कण गोळा करण्याच्या कामात व्यस्त होतात. या नदीकाठच्या वाळूतही सोन्याचे कण आढळून येतात. तांदळाच्या दाण्याहूनही बारीक असलेले हे कण शोधणे म्हणजे काही खायचे काम नाही. सरंदा आणि तामर परिसरात राहणारे लोक नदीतील हे सोन्याचे कण वेचण्याचे काम करतात. संपूर्ण दिवस घालवल्यानंतर फार तर ६० ते ७० मिलीग्रॅम इतके सोने त्यांना सापडते. कधी कधी तर तेही सापडत नाही. महिनाकाठी पाच-सहा हजारांची कमाई होईल इतके सोने तर इथे प्रत्येकाला मिळते.

या नदीच्या जिथे उगम झाला त्या पिस्का या गावी कधी काळी सोन्याच्या खाणी होत्या, इथे खाणकामही केले जात होते. आता मात्र या खाणी संपुष्टात आल्या आहेत. तरीही या नदीच्या पाण्यात आढळून येणारे सोन्याचे कण अनेकांना आश्चर्यात टाकतात. हे सोने कुठून येत असेल याचा अजूनही शोध लागलेला नाही.

आतापर्यंत सोने वाहणारी ही नदी आता युरेनियम आणि तांब्याचे विषारी कणही वाहून आणत आहे. नदीच्या काठी काही ठिकाणी अतिप्रमाणात युरेनियम आणि तांब्याचे खाणकाम केले जाते आणि तेथील सांडपाणी नदीत सोडले जाते. छोटा नागपूर परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी ही नदी म्हणजे त्यांची जीवनदायिनी आहे. प्रदूषणामुळे आता हीच नदी त्यांच्यासाठी मृत्यूचे कारण ठरत आहे.

रित्विक घटक यांनी याच नदीच्या नावाने, ‘सुवर्णरेखा’ नावाचा एक चित्रपटही दिग्दर्शित केला होता. १९६५ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यात बांगलादेशी घुसखोर आणि विभाजनानंतरचे वास्तव दर्शवण्यात आले होते. रवींद्रनाथ टागोर आणि बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या अनेक कवितेतून या नदीचा उल्लेख आलेला आहे.

मेघश्री श्रेष्ठी