करोनाकाळ हा अनेक लहान व्यावसायिकांसाठी मोठा कठीण काळ होता. काहींचे व्यवसाय बुडाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींची उमेद गेली. मात्र याच काळात काहींनी आपल्या आयुष्याचा ट्रॅक बदलला आणि त्यांना याच काळात यश मिळालं. आज आपण वाचणार आहोत करोना काळात सुरू झालेल्या एका यशस्वी व्यवसायाची गोष्ट.
पुण्यात राहाणाऱ्या सौ. रोहिणी अय्यर गेली २५ वर्षे शिवणकाम करत आहेत, आज त्या ६० वर्षांच्या आहेत. या करोना काळाने त्यांच्याही आयुष्याचा ट्रॅक बदलला. त्यांना दिसत होतं की आपल्या ओळखीत आशा काही महिला आहेत आणि त्यांच्या घरात करोना काळात मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. काहींच्या नवऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या तर काहीजणींचे स्वत:चे कामही बंद पडले होते. खरंतर वयाच्या साठाव्या वर्षी आपले उद्योग बंद करून रिटायर व्हायची अनेकांची वेळ असते. पण सौ. अय्यर यांना या विपरीत परिस्थितीने या महिलांना मदत करण्याची नवी कल्पना आणि उमेद दिली.






