या मालिकेत आम्ही भारत आणि जगभर झालेल्या, गाजलेल्या खूनखटल्यांचा मागोवा घेणार आहोत. आजची घटना आहे श्रीलंकेतली.
'रॉयल पार्क मर्डर' हे नाव अगदी हॉलिवूड सिनेमाला शोभेल असे वाटते ना? पण हे नाव कुठल्याही काल्पनिक कथेला दिले नसून हे हत्याकांड खरोखर घडले आहे. २००५ मध्ये घडलेल्या या घटनेमुळे अख्खे श्रीलंका हादरून गेले होते. एका १९ वर्षीय मुलीचा इतका भीषण खून करण्यात आला होता की अंगावर काटा येईल. आज पाहूयात काय घडले होते?
यव्होन जॉन्सन आणि कॅरोलिन जॉन्सन या स्वीडिश बहिणी आपल्या आई वडिलांसह श्रीलंकेत राहत होत्या. आई श्रीलंकन आणि वडील स्वीडिश. आईचे नाव चामलका सपरमाडू जॉन्सन आणि त्यांचे वडील रॉजर जॉन्सन. रॉजर जॉन्सन पहिल्यांदा श्रीलंकेत १९७५ मध्ये पर्यटक म्हणून आले होते. चामलकाच्या प्रेमात पडून ते श्रीलंकेत कायमचे स्थायिक झाले. तिथे त्यांनी दोन रबर उत्पादन कंपन्या सुरू केल्या आणि ते यशस्वी झाले. श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव झाले. यव्होनचा जन्म १५ ऑगस्ट ८५ रोजी झाला. तिची धाकटी बहीण कॅरोलिन ही तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती. यांनी कोलंबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. हे कुटुंब रॉयल पार्क कॉन्डोमिनियम कॉम्प्लेक्स येथे आलिशान घरात राहत होते. रॉयल पार्क ही कोलंबोमधील श्रीमंत लोकांची लक्झरी सोसायटी आहे.
१ जुलै २००५ रोजी, एका महिलेला सकाळी रॉयल पार्क कॉन्डोमिनियम कॉम्प्लेक्सच्या पायऱ्या चढत असताना अचानक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मुलीचा मृतदेह दिसला. ते पाहून तिला धक्काच बसला. तिने अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या मॅनेजरला तात्काळ याची माहिती दिली. त्याने ती मुलगी यव्होन जॉन्सन आहे हे ओळखले. तिची जीन्स तिच्या घोट्यापर्यंत खाली ओढली गेली होती आणि तिच्या गळ्यात गुंडाळली गेली होती. काही वेळात ही बातमी "रॉयल पार्क मर्डर" या शीर्षकाखाली श्रीलंकेत वाऱ्यासारखी पसरली.
चामलका आणि कॅरोलिन अपार्टमेंटमध्ये परतले तेव्हा त्यांना अपार्टमेंटच्या गेटजवळ पोलिसांची जीप दिसली. ती वरच्या मजल्यावर गेली. तिथे तिला तिच्या घराच्या दारासमोर उभे असलेले अनेक पोलीस अधिकारी भेटले. चामलका घाबरली. एका पोलिस अधिकाऱ्याने यव्होनचे ओळखपत्र दाखवले आणि चामलकाला विचारले की तिला यव्होनबद्दल माहिती आहे का. त्या क्षणी चामलका आणि कॅरोलिन यांना यव्होनच्या भीषण हत्येबद्दल कळले. पोलिसांचा तपास वेगाने सुरू झाला.


