'शरीर साथ देत नाही...' म्हणत भारतीय महिला संघातील 'या' क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केले राम राम

'शरीर साथ देत नाही...' म्हणत भारतीय महिला संघातील 'या' क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केले राम राम

येत्या काही दिवसात न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाची विस्फोटक फलंदाज वीआर वनिताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. वयवर्ष ३१ असणाऱ्या वीआर वनिताने ट्विटरद्वारे निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली आहे. 

तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तिने वनडे संघाची कर्णधार मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांचे आभार मानले आहेत. तसेच तिने कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळी आणि संघातील इतर सदस्यांचे देखील आभार मानले आहेत. वीआर वनिता बद्दल बोलायचं झालं तर तिने २०१४ मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात पदार्पण केले होते.

निवृत्ती जाहीर करताना तिने ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, "१९ वर्षांपूर्वी ज्यावेळी मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्यावेळी मी एक लहान मुलगी होते,जिला खेळायला खूप आवडायचे. क्रिकेटवर असलेले प्रेम आजही कायम आहे. माझं मन म्हणत आहे की, आणखी क्रिकेट खेळ. परंतु, शरीर म्हणत आहे की, बस आता थांब. त्यामुळे मी दुसरा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला आहे. मी क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती जाहीर करत आहे.."

अशी राहिली आहे कारकीर्द 

वीआर वनिताच्या कारकिर्दीबद्दल बोलयचं झालं तर तिने आतापर्यंत  एकूण ६ वनडे सामन्यात ८५ धावा केल्या आहेत. तर १६ टी२० सामन्यात २१६ धावा केल्या आहेत. तसेच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये ती कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करते. तिने बंगालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ महिला एकदिवसीय चषक स्पर्धेत आपल्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेत तिने ६ डावात ३७.५० च्यास सरासरीने २२५ धावा केल्या होत्या.

टॅग्स:

cricket

संबंधित लेख