अनेकदा आपण पाहतो की पालक लहान मुलांना बाईक किंवा स्कूटर्सवर नेताना योग्य ती काळजी घेत नाहीत. प्रवास करताना मुलांना झोप येते किंवा नीट बसता न आल्यानं अपघाताची शक्यता वाढू शकते. मुलांना दुचाकीवरुन नेताना वाहतूक नियमांचेही सर्रासपणे उल्लंघन होतं. दुचाकीवर पाच-सहा जणांनी बसणं तर भारतात काही नवं नाहीय. बरेच महाभाग लहान मुलांच्या हातात गाड्या देतात. या सगळ्या कारणांमुळे सरकारनं याबाबत कठोर पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. नियमाप्रमाणे काळजी न घेतल्यास किंवा विनासुरक्षा मुलांना नेणे हा आता गुन्हा ठरू शकतो.
याचे नियम आधीपासूनच आहेत, पण आता त्यात अजून सुधारणा करण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही सुधारणा मोटार वाहन (सुधारणा) कायदा २०१९ च्या संदर्भात आहे. या कलमात म्हणल्याप्रमाणे चार वर्षांखालील मुलांच्या सुरक्षेची तरतूद होऊ शकते. यात ४ वर्षापर्यंतच्या मुलांना दुचाकीवरुन नेताना बाईकचा स्पीड नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ४ वर्षापर्यंतच्या मुलाला घेऊन बाईकवरुन प्रवास करत असाल तर दुचाकीचा वेग ४० किमी. प्रति तासापेक्षा अधिक असू नये.


