प्रियांका ही दिल्लीतल्या एका रिक्षावाल्याची मुलगी. ती आणि तिचे पालक मेट्रो स्टेशनच्या पुलाखाली राहतात. सोबत अशी अनेक स्थलांतरीत कुटुंबं. येणार्या जाणार्या गाड्यांची दिवसरात्र धडधड आणि सोबतीला सार्वजनिक अस्वच्छतेचं साम्राज्य. प्रियांकाला शाळेत जायचं होतं पण तिच्यासारख्या रस्त्यावर राहणार्यांना शाळेत जाण्याची चैन परवडणारी नव्हती. पण अचानक एक दिवस तिला एका शाळेत प्रवेश मिळाला.
तिची शाळा होती अगदी घराजवळच म्हणजे मेट्रो स्टेशनच्या पुलाखाली! ही शाळा सुरु केली होती राजेशकुमार शर्मा या एका दुकानदाराने. आता प्रियांका आणि तिच्या सारखी दोनशे मुलं याच शाळेत शिकतात. राजेशकुमार शर्मा यांनी ही शाळा सुरु केली तेव्हा पुलाखाली शिकवता येईल अशी काही व्यवस्थाच नव्हती. पण हळूहळू आजूबाजूच्या भिंती रंगवण्यात आल्या. काहींनी खुर्च्या पुरवल्या तर काहींनी पुस्तकं आणि इतर सामान. काहीजणांनी एकत्र येऊन मुलींसाठी स्वच्छातागृह बांधून दिलं. आता विद्यार्थ्यांची संख्या दोनशेच्या घरात आहे आणि राजेशकुमार यांच्या एक शिक्षकी शाळेत त्यांच्यासारखेच उत्साही तीन शिक्षक आहेत.


राजेशकुमार शर्मांना त्यांचं शिक्षण घरच्या गरिबीमुळंअर्धवट सोडावं लागलं होतं. जीवनातला हा अनुभव त्यांचं प्रेरणास्थान होतं. या शाळेतील दुसरे शिक्षक लक्ष्मीचंद हे पण बिहारच्या एका खेड्यातून आलेले आहेत. त्यांचे आईवडील रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. त्यांच्या अनुभवानुसार जर योग्य वयात शिक्षण मिळाले नाही तर मुले भरकटतात आणि नक्षलवादासरख्या अतिरेकी मार्गाला लागतात . तिसरे शिक्षक श्याम मेहतो खाजगी शिकवण्या करतात आणि इतर वेळेत या शाळेत शिकवतात. आता बर्याच मुलांनी आजूबाजूच्या महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे, पण अभ्यास ते याच शाळेत करतात. अनेक जनहितवादी संघटनांनी राजकुमार शर्मांना मदतीचा हात दिला. पण नंतर मग बर्याच संघटनांनी त्यांना अपेक्षित असं " ग्लॅमर " न दिसल्यानं काढता पायही घेतला. असं असलं तरी शाळा नियमित चालते आहे. सकाळी नऊ वाजता सुरु झालेली शाळा दुपारपर्यंत चालते.
फार पूर्वी रविंद्रनाथ टागोरांनी झाडाखाली शाळा सुरु केले होती. कालांतराने त्याशाळेचे आज विद्यापीठ झालं आहे. आजच्या शहरीकरणाच्या रेट्यात दिल्ली सारख्या महानगरात ही पुलाखालची शाळा म्हणजे आधुनिक शांतीनिकेतनच म्हणायला हवं.
