भारताच्या पहिल्या महिला मानसोपचारतज्ञ शारदा मेनन कालवश !

लिस्टिकल
भारताच्या पहिल्या महिला मानसोपचारतज्ञ शारदा मेनन कालवश !

ज्याकाळी डॉक्टर म्हणजे फक्त पुरुषच असायचे, त्याकाळी मानसोपचारतज्ज्ञ बनून एका महिलेने भारताच्या इतिहासात आपले नाव नोंदवले. त्यांचे नाव शारदा मेनन. त्या देशातील पहिल्या महिला मानसोपचारतज्ज्ञ होत्या. नुकतेच त्यांचे चेन्नई येथे वयाच्या ९८ वर्षी निधन झाले. आज आपण त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत.

मेनन यांचा जन्म एका मल्याळी कुटुंबात 5 एप्रिल 1923 रोजी कर्नाटक राज्यातील मंगळूर येथे झाला. मेनन या आठ भावंडांपैकी सर्वात धाकट्या होत्या. त्यांचे वडील न्यायाधीश होते. नंतर त्यांची चेन्नई येथे बदली झाली. शारदा यांचे प्रार्थमिक शालेय शिक्षण गुड शेफर्ड स्कूलमध्ये झाले. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची आवड होती. शिकून खूप मोठे कोणीतरी व्हायचे हे त्यांचे स्वप्न होते. नंतर क्राइस्ट चर्च अँग्लो-इंडियन मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून पदवी घेतली.
बेंगळुरूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस येथे त्यांनी मानसोपचार शास्त्रातील दोन वर्षांचा डिप्लोमा यशस्वीपणे पूर्ण केला.

अशा प्रकारे त्या भारतातील पहिली महिला मानसोपचारतज्ज्ञ बनल्या. 1959 मध्ये त्या किलपौक येथील मानसिक आरोग्य संस्थेत ( सरकारी मेंटल हॉस्पिटल) रुजू झाल्या. 1978 मध्ये संस्थेतून त्या निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात संस्थेने मानसोपचार विभाग सुरू केला, बाह्यरुग्ण सुविधा सुरू केली आणि राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रादेशिक मानसोपचार केंद्रे स्थापन केली. मानसिक आजारी रुग्णांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या पुढाकाराने चेन्नईत AASHA, नावाची संस्था सुरू केली.

एवढेच करून त्या थांबल्या नाहीत. 1984 मध्ये मनोचिकित्सक आर. थारा यांच्यासमवेत त्यांनी स्किझोफ्रेनिया रिसर्च फाउंडेशन (SCARF इंडिया) ची स्थापना केली. मानसिक आजारी लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी खूप काम केले. आत्महत्या रोखण्यासाठी अनेक जणांना मदत केली. आता SCARF ही सरकारी संस्था एक पूर्ण संशोधन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. आणि विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मानसिक आरोग्य संशोधन केंद्र म्हणून मान्यताही दिली आहे.

त्यांच्या या भरीव कामगिरीबद्दल 1992 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तामिळनाडू सरकारकडून त्यांना अवैयार पुरस्कारही मिळाला होता.

मानसिक आजारांनी पीडित लोकांच्या सन्मानासाठी त्या आयुष्यभर झटल्या. अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले. शारदा मेनन यांना बोभाटातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

शीतल दरंदळे