एखादी व्यक्ती सैन्यात जाते तेव्हा ती थळ, वायू किंवा नेव्ही यापैकी कुठल्यातरी एका संरक्षण दलाचा भाग होते. पण भारतात एकमेव असे व्यक्तीमत्व होऊन गेले जे या तीनही दलांमध्ये काम करून मग निवृत्त झाले. त्यातही थोडेथोडके नाही,तर तब्बल १०१ वर्षांचे आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. पृथ्वीपाल सिंग गिल हे त्यांचे नाव. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
१९४२ साली जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता त्यावेळी त्यांनी कराची फ्लाईट कॅडेटमधून वायुसेनेत नोकरी सुरू केली. गिल यांना घरातून लष्कराचा वारसा लाभला होता. त्यांचे वडील देखील सैन्यात होते. पण वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलाने वायुसेनेत नोकरी करू नये. कारण तिथे जीवाला धोका अधिक असतो.
गिल यांनी मग वायुसेनेची नोकरी सोडून इंडियन नेव्ही जॉईन केली. गिल इंडियन नेव्हीत असताना दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला. त्यांची नियुक्ती एका कार्गो शिपवर करण्यात आली होती. आयएनएस टियर असे तिचे नाव होते. इथे त्यांनी एकूण ५ वर्षं नोकरी केली.
नेव्हीतही मन रमले नसेल किंवा काय पण त्यांनी आता थेट थलसेना जॉईन केली. १९६५ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानला नामोहरम केले होते. यावेळी महत्वाची भूमिका बजावली ती ७१ मीडियम रेजिमेंटने. या रेजिमेंटचे नेतृत्व गिल साहेबांकडे होते.
गिल यांनी त्याकाळात सॅम माणेकशॉ या भारताच्या महान सैन्य अधिकाऱ्यांसोबत काम केले आहे. सॅम आणि गिल सोबत शिकारीला जायचे ही आठवणदेखील गिल सांगायचे. १९७० साली कर्नल पदापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी निवृत्ती घेतली. पण निवृत्त झाल्यावरही त्यांचा सैनिकी पिंड त्यांना शांत बसू देत नव्हता.
इमारतींवर सोलर प्लँट लावण्यात यावे यासाठी ते आग्रही होते. यासाठी त्यांनी पंजाब आणि हरियाणा न्यायालयात याचिका पण दाखल केली होती. वयाचे शतक पूर्ण करून समाधानी आयुष्य जगून झाल्यावर त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी भारतीयांना एक अभिमानास्पद वारसा ते सोडून गेले आहेत.
त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९२७चा. १०१व्या वाढदिवसाला पूर्ण एक आठवडाही कमी असताना त्यांचं निधन झालं.
उदय पाटील
