तुम्ही कोण ? दिलवाले की दिमागवाले ?

तुम्ही कोण ? दिलवाले की दिमागवाले ?

शेअरबाजारातून लाखो रुपये कमावण्याची आकांक्षा असणार्‍यांसाठी हा खास " बोभाटा"चा लेख.

शेअर बाजार म्हणजे  क्षणाक्षणाला  हलणारे भाव -एका क्षणी साकार होणारी स्वप्ने आणि तर दुसर्‍या क्षणात  हवेत विरून जाणार्‍या आकांक्षा -एका क्षणात आकाशात तर दुसर्‍या क्षणी जमीनीवर तर पुढच्या क्षणाला पायाखालची जमीन खचण्याचा भास. 

हे सगळे रोज. सकाळी सव्वा नऊ ते साडेतीन . रोज हजारो कंपन्यांच्या लाखो शेअर्सची अब्जावधी रुपयांची उलाढाल. कधी बाजार चारशे अंकांची घसरण तर साडेतीनशे अंकांची भरारी ! 
चला तर , चला जाऊ या ,या थर्रार नाटकाच्या रंगमचावर .

एक सूचना : एखादी लवंग खाऊन गरमी होणार्‍याचे आणि वेलचीचे चार दाणे चघळून सर्दी होणार्‍यांचे हे नाटक नाही .इथे हवेत घट्ट मनाचे आणि तगड्या छातीचे बापये. इतर नाटकात एकच सरकरणारा फिरणारा रंगमंच असतो पण इथे आहेत दोन रंगमच .सरकणारे - फिरणारे आणि सवय होईस्तो घेरी आणणारे. एक बॉंम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि दुसरा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज .

आपण मनास येईल तेथे जाऊ शकतो. 

या नाटकाचे लेखक  आपणच .तुम्ही सोडून एकच पात्र आहे या मंचावर : तुमचा ब्रोकर. बाकी नायक -नायीका -खलनायक आणि प्रेक्षक सगळे काही तुम्हीच. टाळ्या तुम्हीच वाजवायच्या आणि डोळे भरून आले तरी तुम्हीच पुसायचे. या दोन रंगमचावर एकाच वेळी लाखो नायक असतात तरी प्रत्येकाचे नाटक वेगळे आणि स्वतःपुरतेच.

काय ? कसे वाटले शेअरबाजाराचे नाट्यीकरण .आवडले ?

तर मग चला या आणि करा कामाला सुरुवात.

नाटकात भाग घायचा म्हणजे भूमिका करायला हवी .या रंगमच्यावर दोन भूमिका आहेत .एक दिलवाल्याची आणि दुसरी दिमाग वाल्याची. यापैकी आपली भूमिका कोणती हे ठरवण्यासाठी दोन्ही भूमिका आधीच सांगतो. दिलवाल्यांचा  गुंतवणूकीचा खेळ भावनांवर आधारीत  असतो. त्यांना ज्या दिवशी बाजार हिरवा दिसतो त्या दिवशी ते खरेदी  आणि ज्या दिवशी काळा दिसतो त्या दिवशी विक्री ..मग हे रंग दिसतात तरी कसे ? सकाळी जाग आल्यापासून दिनक्रम सुरु असेपर्यंत  खाजगी आणि सार्वजनीक आयुष्यात जे काही घडत  असेल त्याचे प्रतिबिंब दिलवाल्यांच्या खेळावर पडते . शंभरापैकी पंचाण्णव माणसे दिलवाली असतात .ज्या दिवशी  मंदी दिसते त्यादिवशी विक्री तर ज्या दिवशी तेजी दिसते त्या दिवशी खरेदी.

गंगा गये गंगादास -जमना गये जमनादास.

परीणामी दिलवाल्यांचा गल्ला जसा क्षणात गच्च भरतो तसा दुसर्‍या क्षणी रिकामा पण होतो. दिलवाले कमावतात ज्या पध्दतीने त्याच पध्दतीने गमावतात पण. आता दुसरी जमात दिमागवाल्यांची. ह्यांना भावनेपेक्षा भाव महत्वाचा वाटतो गल्ल्यात खणखणीत नाण्यांची भरती होताना  ( एखाद्या शेअरचा भाव वाढताना) ते दिलवाल्यांच्या टोळीत सामील होतात आणि गल्ला भरला की गंगाराम झोळीत भरून या रंगमंच्यावरून पोबारा करतात.(आपले उद्दीष्ट नजरेस आले की दुप्पट जोमाने विक्री करून टोळीच्या बाहेर पडतात.) सराईत बहुरुप्याला लाजवील असे बहुरुपी. आपल्या रोजच्या जीवनातले उदाहरण द्यायचे तर हे किर्तनाच्या पूर्वरंगात कधीच नसतात .उत्तररंगाची कथा ऐकून किर्तनकाराची थाळी फिरवण्याची वेळ येण्याआधी पसार होऊन घरी पोहचलेले असतात .

आता ठरवा या रंगमचावर तुम्ही कोण आहात ? दिलवाले की दिमाग वाले ?