आजच्या तिसऱ्या भागात आपण कमीत कमी भांडवलात काय करता येईल याची माहिती करून घेणार आहोत.
लोखंड : जहाज तोडणीमध्ये ९० टक्के भाग लोखंडाचा असतो. अर्थातच या व्यवसायातील बहुतांश संधी लोखंडाशी निगडीत असतात. जहाज कापल्यावर लोखंडाचा पत्रा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. पत्रा हा शब्द वर्णनास अपुरा आहे. याचे कारण असे की पत्रा म्हणजे पातळ पत्रा असेच चित्र डोळ्यांपुढे उभे राहते . म्हणून आपण पत्र्याऐवजी स्टील प्लेट हा शब्द पुढे वापरू या !
उद्योग १- रोलिंग मिल्ससाठी दलाली
जहाज कापणीत ज्या प्लेट्स मिळतात त्यांचा उपयोग रोलींग मिलमध्ये बांधकामाच्या लोखंडी सळया बनवण्यासाठी केला जातो. प्लेटची जाडी जशी असेल त्या प्रमाणे सळ्यांची जाडी बनते. प्लेटची जाडी चार आणे-आठ आणे अशी सांगीतली जाते. चार आणे म्हणजे पाव इंच तर आठ आणी म्हणजे अर्धा इंच!! रोलींग मिल्सना या प्लेट्स पुरवणे हा एक उत्तम व्यवसाय आहे. या प्लेट खरेदी करून विकणे हा व्यवसाय करता येणे कठीण आहे. कारण एका गाडीत १७ ते १८ टन माल बसतो. म्हणजे भांडवली गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणात करावी लागते. रोलींग मिलकडून पैसे साधारण ३ ते ४ महिन्यांनंतर मिळतात. तोपर्यंत पैसे गुंतून पडतात. मार्जीन टनामागे जेमतेम १००० रुपयांचे असते. दुसरा महत्वाचा पैलू असा की एक्साइज बिलाचा फायदा- ज्याला गेटपासचा फायदा असे म्हटले जाते तो मिळवण्यासाठी रोलींग मिल्स शिपब्रेकर कडून डायरेक्ट माल घेणे पसंत करतात. मग हे सगळे व्याप करण्यापेक्षा मिलसाठी दलाली करणे फायद्याचे असते. नाशिक ,जालना, जळगाव, धुळे, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये अनेक मिल आहेत. आपल्या जवळच्या मिलला संपर्क करून त्यांच्यासाठी दलाली करणे हे अनेक दृष्टीने फायद्याचे असते. भांडवल गुंतत नाही आणि दलालीही दोन्ही बाजूनी मिळते. मिलकडून 'खर्ची आणि भराई ' मिळते त्यातून नफा होतो तो वेगळाच. थोडक्यात बिनभांडवली काम करून नफा कमावता येतो.
उद्योग २- भंगार विक्री किंवा दलाली
लोखंडाचा पुढचा प्रकार म्हणजे HMS-1 आणि HMS-2 या जातीचे भंगार!! HMS म्हणजे “हेवी मेल्टिंग स्क्रॅप”. लोखंड वितळवून त्यापासून Ingots बनवणाऱ्या सर्व कंपन्यांना हा कच्चा माल लागतो. या भंगाराचे भाव शेअर बाजारातल्या शेअरप्रमाणे रोज वर खाली होत असतात. या व्यवसायात कमवायची संधी वर लिहिल्याप्रमाणे दलालीतून मिळते किंवा गोदाम असेल तर मोठ्या प्रमाणात हे भंगार गोळा करून योग्य वेळी विकण्यात असते.
उद्योग ३- बीड विक्री
याखेरीज बीड या लोखंडाच्या प्रकाराला मोठी मागणी असते. परंतु प्लेट आणि HMS च्या तुलनेत बीड कमी प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे बीड गोदामात जमा करून योग्य वेळी याची विक्री करणे हा फायदेशीर धंदा आहे. पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली, बेळगाव, या भागात बीडच्या ओतकामाचे अनेक कारखाने आहेत. तेथे बीडाला चांगला भाव आहे. महाराष्ट्राबाहेर गुजरातेमधील सुरत तर उत्तरप्रदेशात आग्रा, अलिगढ, या भागात बीडची मोठी मागणी असते.
उद्योग ४- पाईप विक्री
एक विशेष प्रकार म्हणजे जहाजांत अनेक प्रकारचे पाईप मिळतात. पाईपचा भाव, जाडी आणि लांबी या प्रमाणात कमी जास्त असतो. पाईप ड्रॉईन्ग करणाऱ्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात आहेत, त्यांच्यासाठी हा कच्चा माल आहे. सुस्थितीतल लांबलचक पाईप आहेत तसे अनेक उद्योग व्यवसायात वापरले जातात.
अशाप्रकारे लोखंडाच्या अनेक प्रकारांचा व्यापार सहज करता येतो. पण सर्व प्रकारचे लोखंड एकाच वेळेस विकणे व्यवहार्य नाही. बाजारात तुमची ओळख प्लेटवाला किंवा पाईपवाला अशीच तयार होत असते. त्यामुळे एक प्रकार हाताशी धरून काम/व्यापार करणे फायद्याचे असते.
पुढच्या भागात आपण “माल” म्हणजेच तांबा पितळेच्या भंगाराविषयी वाचूया..

स्रोत