झोपलेलं असताना कधीतरी अचानक आजूबाजूला कुणाच्यातरी घोरण्याच्या त्रासदायक आवाजाने जाग येते. असं कधी घडलं आहे का कोणासोबत? कधीकधी तर एकदा झोपमोड झाली की नंतर या चित्रविचित्र आवाजांमुळे झोपच लागत नाही! पण मुळात घोरणं म्हणजे काय?
झोपलेलं असताना कधीतरी अचानक आजूबाजूने घोरण्याचा डोक्यात जाणारा आवाज येतो आणि जाग येते. बरं, या आवाजाचीही एक लय असते, घुरर्र-खुर्रर्र, घुरर्र-खुर्रर्र अशी. एरवीच्या रात्रीच्या शांत वातावरणात हा आवाज फारच विचित्र वाटतो. लग्नमंडपात झोपलेल्यांमध्ये हमखास एक तरी घोरणारा असतोच! इतरांची झोपमोड करून त्यांच्या शिव्या खात हे महाशय मस्त आपल्याच धुंदीत चित्रविचित्र आवाज करत निद्राधीन झालेले असतात. बाकीच्यांची रात्र मात्र 'करवटें बदलत' सरते. पण घोरणाऱ्या माणसांच्या नावाने शंख करण्याआधी मुळात घोरणं म्हणजे काय, आणि त्यामागची कारणं हे समजून घ्यायला हवं.







