बांगड्या विकणारा मुलगा ते IAS

बांगड्या विकणारा मुलगा  ते  IAS

’कोशिश करनेवालोंकी हार नहीं होती’ हे वाक्य वापरून कितीही गुळगुळीत झालं असलं, तरी बरेचदा मनोमन पटतं.  आज बोभाटा.कॉम घेऊन आलेय अशीच एक प्रेरणादायक कहाणी-  अथक परिश्रमाने IAS अधिकारी बनलेल्या बांगड्या विकणार्‍या स्त्रीच्या मुलाची.

 नशिबाने वाट्याला दिलेल्या दयनीय आणि प्रतिकूल परिस्थीतीशी झुंजून आपल्या नावाचा झेंडा अटकेपार गाडणार्‍या लोकांची बातच वेगळी असते. याच लोकांच्यात सामिल होतो 'रमेश गोरख घोलप,' ज्याने कडव्या परिस्थितीवर मात करून यशाची सर्वोत्तम चव चाखली.

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या महागाव गावात रमेशचं कुटुंब राहायचं. आई, वडिल, रमेश आणि त्याचा मोठा भाऊ असा हा चार लोकांचा परिवार. गावात वडिलांचे सायकल दुकान आणि आईचा बांगड्या विकण्याचा व्यवसाय होता. आईसोबत रमेशही बांगड्या विकायला जात असे.  रमेशच्या एका पायाला पोलिओ होता तर वडिलांना दारूचे व्यसन लागले होते. भरीस भर रमेश कॉलेजच्या शिक्षणासाठी बार्शीला असतानाच वडिलांचा टि.बी ने मृत्यू झाला. त्यावेळी रमेशकडे महागाव पर्यंत जाण्यासाठी बसचे पैसेही नव्हते.

रमेश बारावीत 88% गुणांनी उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने डी.एड पूर्ण केलं व शिक्षकाची नोकरी पत्करली. पण त्याच्यासमोर ध्येय मात्र वेगळं होतं. समाजाची दुर्दशा त्याने जवळून पाहीली होती. त्याला प्रशासकीय सेवेत काम करायचे होते. त्यासाठी परिक्षांची तयारी करण्यासाठी 9 महिन्यांची रजा काढली आणि पुण्यात येऊन अभ्यास केला.  पण इथे आधी प्राथमिक परिक्षेतच अपयश आलं  आणि नंतर ग्रामपंचायत निवडणूकीत पराभव झाला. रमेशने खचून न जाता परत स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू केली. भावाला नोकरी लागल्यानंतर आधी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. युपीएससीच्या तयारीसाठी वर्षभर मुंबईमध्ये वास्तव्य केल्यानंतर रमेशला पुण्यात यशदा मध्ये प्रवेश मिळाला. आईने अगदी गावकऱ्यांकडून पैसे गोळा करून रमेशला पैसे पाठवले. यावेळी रमेश एमपीएससी आणि युपीएससी या दोन्ही परिक्षांची तयारी करत होता. याचवेळी त्याने मुक्त विद्यापीठाचे 8 पेपरही दिले होते. २०१० मध्ये अपयशी ठरलेला रमेश २०१२साली एमपीएससी राज्यात प्रथम आला. आणि त्याचवेळी युपीएससी मध्ये त्याला देशात २८७वी रँकींग मिळाली. त्याचे स्वप्न आता वास्तवात आले होते.

 

"स्पर्धा परीक्षा देताना प्रत्येक टप्प्यावर स्वतःमधील उण्या-अधिकाची जाणिव करुन घ्यायला हवी, या क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन मिळवायला हवे." असे रमेश सांगतो.

आज रमेश घोलप झारखंडमध्ये काम करत आहेत. त्यांच्या या संघर्षमय प्रवासाला टीम बोभाटाचा सलाम.  रमेश घोलपांची ही यशोगाथा भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल हे नक्की.