टीव्हीवर इतक्या जाहिराती येत असतात. पण त्यातल्या आपण कितीशा जाहिराती बघतो? मोजक्याच. खरं तर कधी एकदाची जाहिरात संपते आणि सिरीयल पुन्हा सुरु होते याचीच आपण वाट बघत असतो. सगळ्याच जाहिरातींशी आपलं तसं काही घेणं देणं नसतं. पण काही मनोरंजक असतील तर नक्कीच लक्षात राहतात.
काही खास लक्षात राहणाऱ्या जाहिरातींपैकी एक जाहिरात हल्ली तुम्ही टीव्हीवर बघितली असेल. ही अॅड फिल्म आहे सोनी बीबसी अर्थ 'फील अलाइव्ह’ या चॅनेलची. यात करीना जगभरातल्या निसर्गरम्य ठिकाणी फिरताना दिसत आहे. अनेक सुंदर ठिकाणांची दृश्यं जाहिरातीत दिसतायत. साधारण १ मिनिट, ११ सेकंदात आपल्याला पूर्ण जग फिरल्याचा आभास यात होतो.
....पण करीना खरंच या सर्व जागी फिरली आहे? या सर्वांचं चित्रीकरण कोणकोणत्या ठिकाणी झालं असावं बरं? उत्तर आहे एका अगदी लहानशा स्टुडीओ मध्ये.
मंडळी मार्केटिंगचे नवे फंडे आणि बदलत्या तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. करीना दिसत असलेल्या या अॅड फिल्ममध्ये VFX चा भरपूर वापर करत एक भव्य जाहिरात तयार केली गेली आहे. काही वर्षांपर्यंत फक्त चित्रपटांपुरतं मर्यादित असलेली व्युज्युअल इफेक्ट प्रणाली आता जाहिरातीत सुद्धा वापरली जात आहे. तंत्रज्ञानाने केलेली क्रांती यातून दिसून येतेय. २ मिनिटापेक्षा कमी लांबीच्या एका फिल्मसाठी किती मेहनत घेतली जाते हे तुम्हाला खालील व्हिडीओ बघितल्यावर कळेल.
