वर्दीतल्या दुर्गा: गूढ गुन्हे उकलणाऱ्या आणि मुलींना आत्मसंरक्षणासाठी सबल बनवणाऱ्या सौम्या सांबशिवम

लिस्टिकल
वर्दीतल्या दुर्गा: गूढ गुन्हे उकलणाऱ्या आणि मुलींना आत्मसंरक्षणासाठी सबल बनवणाऱ्या सौम्या सांबशिवम

आज आपण ओळख करून घेऊयात शिमलाच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी सौम्या सांबशिवम यांची. त्यांची कामगिरी वाचल्यावर या अधिकऱ्याविषयी नक्कीच अभिमान वाटेल. सौम्या सांबशिवम या त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखल्या जातात. खुनाचे गूढ उकलण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यांनी सिरमौर जिल्ह्यात असताना तब्बल सहा खून प्रकरणं केवळ २ दोन वर्षांत सोडवली आहेत. त्यातली दोन खून प्रकरणं तर गूढ आणि अतिशय अवघड होती. पण सौम्या यांनी ज्या हुशारीने ती सोडवली त्यामुळे सिरमौर पोलीसच नाही, तर हिमाचल पोलीसांचे नाव बऱ्याच दिवस बातम्यांमध्ये होते. त्यांचे कौतुक सगळीकडे होत होते. सौम्या यांनी याशिवाय अनेक प्रकरणे सोडवण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या दराऱ्याने गुन्हेगारांच्या मनात भीती बसली आणि त्यांच्याशी पंगा घेण्याची कोणी हिंमत केली नाही.

सौम्या सांबशिवम या मूळच्या केरळच्या आहेत. त्या २०१०च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील अभियंता होते. सौम्या त्यांची एकुलती एक मुलगी आहे. जीवशास्त्रमधून पदवी घेतल्यानंतर सौम्या यांनी मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीए केले. त्यांनी बहुराष्ट्रीय बँकेत कामही केले आहे. त्यांना लेखनाची आवड आहे. त्यांना लेखक व्हायची इच्छा होती. नंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षा दिली आणि त्या IPS झाल्या. स्वतंत्र भारतातील शिमला, हिमाचल प्रदेशच्या पहिल्या महिला पोलीस अधीक्षक बनण्याचे श्रेय सौम्या संबाशिवम यांना आहे.

सौम्या यांनी शिमलामध्ये पोलिस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला त्यावेळी एका निष्पाप मुलीच्या हत्येचे प्रकरण चर्चेत होते. तेव्हा त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी थोडा वेगळा विचार केला. शाळा आणि महाविद्यालयीन मुलींच्या छेडछाडीच्या घटना टाळण्यासाठी सौम्या यांनी विशेष स्प्रे बनवण्याचे प्रशिक्षण दिले.
हे स्प्रे मिरची, नेल पेंट आणि एक केमिकलच्या मदतीने तयार केले. या स्प्रेची एकदा फवारणी केल्यानंतर गुंड अर्धा तास त्यांचे डोळे उघडू शकत नाहीत. त्याचा प्रभाव अर्धा तास टिकतो. हे स्प्रे मुलींनी त्यांच्याजवळ बाळगण्याचा सल्ला दिला. अनेक मुलींनी याचे प्रशिक्षण घेतले.

सौम्या संबाशिवमने ड्रग्स, अल्कोहोल आणि मानवी तस्करीला आळा घालण्याच्या दिशेनेही उत्तम काम केले. असे म्हटले जाते की २००६ मध्ये एका प्रात्यक्षिकादरम्यान सौम्याने एका आमदाराला दूर जाण्यास सांगितले. पण त्याने नकार दिला. त्यावेळेस न घाबरता त्यांनी आमदाराला थोबाडीत मारली. ही बातमी माध्यमात आली आणि एकच गहजब झाला. त्या आमदाराने असे काही झाले नसल्याचे सांगितले.

सौम्या संबाशिवम या हिमाचल प्रदेशातल्या सिरमौरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सिरमौरच्या आधी त्या शिमलामध्ये होत्या आणि शिमलामध्ये पोलीस आणि सीआयडीमध्येही काम केले आहे. या दबंग ऑफिसरला एक सॅल्यूट तर बनतोच.

शीतल दरंदळे