कुत्रा, मांजर, असे प्राणी पाळण्याची हौस अनेकांना असते. म्हणून तर आज कुत्रा आणि मांजर यांच्या काही प्रजातींची किंमत ही लाखांच्या घरात आहे. पण कुणाला किडे पाळण्याचीही हौस असते असं जर तुम्हाला सांगितलं तर पटेल का? नक्कीच नाही. तरीही दुनियात हौशा-गवशा लोकांची काही कमतरता नाहीय. अशाच हौशी लोकांमुळे सध्या स्टॅग बीटल नावाच्या एका किड्यालाही सोन्याचा दर आला आहे. काही परदेशी पर्यटक तर निव्वळ या किड्यासाठी भारताला भेट देतात. काही ठिकाणी याची अवैध तस्करीही केली जाते. फक्त पाच इंच आकारमानाच्या या किड्याला इतका भाव कशासाठी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. जाणून घेऊया स्टॅग बीटल नावाच्या या किड्याबद्दलची अधिक माहिती.
स्टॅग बीटल हा तसा अगदी छोटासा दिसणारा कीटक आहे. हा निसर्गासाठी अत्यंत पोषक आणि मानवासाठी निरुपद्रवी आहे. हा कीटक कधी चावा घेत नाही. हा दिसायलाही फार सुंदर किंवा आकर्षक दिसतो असे नाही. याची रचना देखील अगदीच विचित्र आहे. पूर्ण वाढ होण्याआधी या कीटकाचे संपूर्ण आयुष्य मातीखालीच जाते. झाडाच्या वठलेल्या फांद्या हा याचा मुख्य आहार. हा कीटक कधीच कुठल्या वनस्पतीची पाने, खोड, फूल किंवा फळांवर ताव मारताना दिसणार नाही. पूर्णतः वठून गेलेल्या मृत झाडाच्या सुकलेल्या लाकडावरच याची गुजराण होते. उलट अशी सुकलेली पाने, देठ, लाकूड हाच याचा आहार असल्याने नैसर्गिकरित्या होणारा कचरा कमी होतो. याच्या तोंडावाटे स्त्रावणाऱ्या लाळेमुळे जमिनीला काही पोषक द्रव्ये मिळतात.

