रशिया आणि युक्रेनच्या युद्धात अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. अनेक इमारती, घरे उद्ध्वस्त होत आहेत. माणसांचा जीव जात आहेत. भिती, दहशत, संहार, मृत्यू असेच वातावरण तिथे आहे. पण यामध्ये अचानक एक सुखद बातमी येते आणि थोडे हायसे वाटते. होय! आज आम्ही अशा चिमुकल्याच्या धाडसाची कहाणी सांगत आहोत, ज्याने एकट्याने अशा वातावरणात ७०० मैलांपेक्षा जास्त अंतर प्रवास केला आणि तो आज सुरक्षित आहे. या मुलाचे स्वागत स्लोव्हाकियाच्या अधिकाऱ्यांनी केले आणि त्याचे खरा हिरो असे कौतुकही केले.
हा ११ वर्षाचा मुलगा युक्रेनमधील झापोरिझ्झिया येथील आहे. शनिवारी रशियन सैन्याने झापोरिझ्झियामधला अणु प्रकल्प ताब्यात घेतला आहे. रशियन सैन्याने शुक्रवारी पहाटेच या अणु प्रकल्पावर हल्ला केला होता. हा अणु प्रकल्प युरोपातील सर्वात मोठ्या प्रकल्पापैकी एक ओळखला जातो. त्यामुळे झापोरिझ्झियामधले वातावरण भीषण आहे. रशियन सैन्य तेथे जोरदार आक्रमण करत आहेत. त्यामुळे तिथल्या नागरिकांना तिथून हलवण्यात येत आहे. नागरिकांमध्ये साहजिकच भीतीचे वातावरण आहे.

