गोड कोणाला आवडत नाही? कमी जास्त प्रमाणात सगळ्यांना गोड आवडतं? का आवडतं? सोपं आहे! आपल्या जिभेवर गोड चव सांगणाऱ्या चवीच्या कळ्या (टेस्ट बड) लहानपणी सर्वप्रथम तयार होतात आणि इतर चवीच्या कळ्या नंतर तयार होतात. थोडं वय वाढलं की आवडीनिवडी तयार होतात, पण गोड घास सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. पंचाईत तेव्हा होते जेव्हा डॉक्टर सांगतात "आता जिभेवर ताबा ठेवा, वजन नियंत्रणाबाहेर जातं आहे" किंवा काहींना डॉक्टर म्हणतात, "तुमची फास्टींग शुगर लिमीटच्या वर आहे, तुम्हाला मधुमेह झाला आहे. गोड खाऊ नका. साखर तर अगदी बंद!!"
आता वर्षानुवर्ष साखरेची लागलेली सवय एका दिवसात बंद होत नाही आणि साखरेची गोडी असल्याशिवाय चहाचा घोट गळ्याखाली जात नाही. अशा वेळी कृत्रिम साखर म्हणजे (आर्टीफीशल स्वीटनर) वापरणे हा एकच इलाज शिल्लक असतो. हळूहळू साखरेऐवजी इक्वल - न्युट्रास्वीट, इक्वल मेजर - स्वीट अॅन्ड लो चा वापर सुरु होतो. या सगळ्यामध्ये गोडी साखरेच्या अनेक पट असते आणि कॅलरी शून्य असतात. समस्या अशी आहे की कृत्रिम साखर म्हणजे निव्वळ रसायन असते. ॲस्परटेम - सुक्रालोज -सॅकरीन अशी नावं अनेक असतील, पण रसायनं म्हटलं की त्याचे साईड इफेक्ट पण आलेच. म्हणजे आली का नवी पंचाईत!
ज्या निसर्गाने आपल्या शरीरात मधुमेह दिला, त्याच निसर्गाने आपल्याला एक देणगी पण दिली आहे ती म्हणजे स्टीव्हिया.
स्टीव्हिया ही अशी एक वनस्पती आहे की तिची पाने साखरेपेक्षा १५० पट गोड असतात. कॅलरी काहीच नसतात. साखर नाही, म्हणजे मधुमेहींना सोयीची आणि कॅलरी नाहीत म्हणजे वजनही वाढण्याची शक्यता नाही. आता तर स्टीव्हिया पासून बनवलेली मिठाईपण मिळते.

Stevia rebaudiana या नावाने ओळखली जाणारी वनस्पती दक्षिण अमेरिकेतले आदिवासी गेले १५०० वर्षं वापरत आहेत. आता तर जगभर या वनस्पतीची लागवड शेतीप्रमाणे व्हायला सुरुवात झाली आहे. पंजाब - हिमाचल प्रदेशात अनेक शेतकरी हे नियमित पीक म्हणून स्टीव्हियाची लागवड करीत आहेत. महत्वाची गोष्ट अशी की स्टीव्हियाची लागवड करणे सोपे आहे. ही वनस्पती झुडुपासारखी वाढते. स्टीव्हियाची पाने खुडून त्याची विक्री केली जाते. एकदा पाने खुडली की काही दिवसांनी नवी पालवी फुटते.



या वनस्पतीचा व्यापारी फायद्याचा प्रचार न झाल्याने स्टीव्हियाची लागवड महाराष्ट्रात सरसकट केली जात नाही. काही शेतकऱ्यांनी हे प्रयोग केले आहेत, पण योग्य असा बाजार न सापडल्याने लागवड कमी झाली. हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी सिध्द केलेले स्टीव्हियाच्या लागवडीचे गणित आज आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत.
स्टीव्हिया (टिश्यु कल्चर) १ एकर लागवडीचा खर्च आणि उत्पन्न -
२५००० रोपे एका एकरात लावण्यासाठी १२५०० हजार खर्च येतो.
एकदा लावली की चार वर्षे नविन रोपे लावण्याची गरज नाही.
दर ३ महिन्यांनी पानांची खुडणी करता येते.
बाजारभाव १२० रुपये किलो.
पहिल्या वर्षी १५०० ते १८०० किलो सुकलेली पत्ती गोळा होते.
दुसऱ्या वर्षी १८०० ते २००० किलो पत्ती मिळते. तिसऱ्या वर्षी २२०० तर चौथ्या वर्षी २५०० किलो पत्ती मिळते.
एकूण मजूरीचा खर्च १००००० च्या आसपास येतो.
आता, उरलेले गणित तुम्ही करून बघा आणि काही अधिक माहिती हवी असेल तर फार्मर क्लब ऑफ हिमाचल प्रदेश या संस्थेला फोन करा - 9418974425/ 8837671544
किंवा मेल करा - farmerclubhp@gmail.com
(ही माहिती वाचकांच्या सोयीसाठी दिली आहे. बोभाटा आणि फार्मर क्लब ऑफ हिमाचल प्रदेश यांचा काहीही व्यावहारीक संबंध नाही.)
(छायाचित्र स्त्रोत : Farmer Club Himachal Pradesh)
