शापित-सुधीर फडके आणि १ रुपयाचा चेक ते लतादीदी-किशोर कुमारांचे एक रुपया मानधनाचे किस्से!!!

लिस्टिकल
शापित-सुधीर फडके आणि १ रुपयाचा चेक ते लतादीदी-किशोर कुमारांचे एक रुपया मानधनाचे किस्से!!!

एक काळ होता जेव्हा रुपयांची किंमत सोळा आणे होती. १ एप्रिल १९५७ पासून आपण दशमान पद्धती स्वीकारली आणि रुपयाची किंमत शंभर पैसे झाली.

पै गेले, आणे गेले, पण रुपया तसाच राहिला. प्रत्येक काळात रुपयाची अनेक ऐतिहासिक रुपं नजरेस येतात. ज्या काळातील कागदपत्रं असतील त्यानुसार रुपया बदललेला दिसतो. महाराष्ट्रात व्यवहारातील करार-मदार नोंदवणारी बहुतेक कागदपत्रं मोडी लिपीत आढळतात. या कागदपत्रांत तर अनेक वेगवेगळे रुपये नजरेस येतात. एका प्रकारचा रुपया दुसर्‍या रुपयापेक्षा वेगळाच असतो. त्या रुपयांचं कोष्टकही वेगळं असतं.

रुपयाची कोष्टकं:

रुपयाची कोष्टकं:

म्हणजे असं बघा की कंपनी सरकारच्या रुपयाचं गणित असं होतं.

३ पै = १ दिडकी । ४ दिडक्या = १ आणा। १६ आणे = १ रुपया

ज्या भागात कंपनी सरकारचे राज्य नव्हते त्या राज्यांत रुपयाचा हिशोब असा होता.

४ कवड्या= १ गंडा । ४ गुंडे = १ दमडी । ४ दमड्या = १ पैसा | ४ पैसे = १ आणा । ४ आणे म्हणजे १ पावली । ४ पावल्या = १ रुपया

या राज्यांमध्ये छोट्या नाण्यांचा पुरवठा जसा कमी जास्त व्हायचा, त्याप्रमाणे भाव बदलायचा. रुपया हा शब्द बहुतेक राज्यांत वापरला जायचा आणि त्याचा भाव कंपनी सरकारच्या रुपयाच्या तुलनेत सांगितला जायचा.

काही उदाहरणं बघूया..

चांदवड रुपया : मुंबई, सुरत, पुणे या भागात हा रुपया चालायचा. १०४ चांदवडी रुपये म्हणजे कंपनी सरकारचे १०० रुपये.

चिंचवडी रुपया पुणे आणि कोकणात चालायचा. १०४ चिंचवडी रुपये = १०० कंपनी सरकारचे रुपये.

भडोच रुपया, बडोदी रुपया, बाबाशाई रुपया असे रुपयाचे अनेक प्रकार अस्तित्वात होते. या सर्व रुपयांचे एक वैशिष्ट्य असे होते की प्रत्येक रुपया वाजवून बघितला तर खणखणीत वाजायचा. 'हातात दमडी नाही', 'दातावर मारायला दिडकी नाही', ' कवडीमोल होणे', 'आपलं नाणं कसं खणखणीत', 'सोळा आणे काम होणे' हे शब्दप्रयोग मराठीत कसे आले असतील हे लक्षात आलंच असेल!

पण रुपया शब्दाला एक वेगळंच रुप आहे. ते आहे मिळणार्‍या सामाजिक किंमतीचं -प्रतिष्ठेचं आणि काही वेळा मिळालेल्या मानाचं-अवमानाचं! हे वाचल्यावर काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना केलेल्या एक रुपया दंडाची आठवण तुम्हाला झालीच असेल. पण तो आजचा विषय नाही. आज काही वेगळेच किस्से आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

अब्जो-करोडो रुपयांच्या बॉलीवूडच्या दुनियेत एक रुपयाची किंमत ती काय असणार? पण गीतकार साहिर लुधियानवीचा १ रुपया फार मोठा होता.

चित्रपटसृष्टीत लेखक– गीतकार यांना चित्रपट कलावंत आदीच्या तुलनेत मान कमीच असतो. दुर्दैवाने त्याला हातभार लावणारे लोक त्यांच्यापैकीच असतात. ही खटकणारी गोष्ट साहिर लुधियानवीला चांगलीच झोंबत होती. पण स्वतःला प्रस्थापित करण्याच्या काळात तो सर्व सोसत राहिला. पण त्या रागाची आग त्याने धुमसत ठेवली आणि त्याला तोंड फुटलं ‘हमदोनो’ चित्रपटाच्यावेळी. त्या चित्रपटाचे संगीतकार होते जयदेव. साहिरने संगितले, "मला संगीतकारापेक्षा एक रुपया जास्त हवा. तरच मी गाणी लिहिन. "अर्थात जयदेव यांच्याशी सल्लामसलत करून निर्मात्यांनी साहिरची अट मान्य केली. गीतकाराचं श्रेष्ठत्व साहिरने असं वसूल करून दाखवलं. चित्रपटसृष्टीतले आर्थिक व्यवहार खुलेपणानं कुणी सांगत नाही. बर्‍याचदा ते सोयीचं नसतं हे देखील एक कारण असतं. पण त्यामुळे ह्या गोष्टी अज्ञातच राहतात.

आता "तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?" हे विचारणाऱ्या ‘शापित’ चित्रपटाच्या वेळचीच गोष्टा पाहा –

चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून निर्मात्यांनी सुधीर फडके यांना घेण्याचं ठरवलं. अर्थात तेव्हा सुधीर फडके नावाचा मोठा दबदबा होता. हे सुधीर फडके यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे निर्मात्यांना स्पष्टपणे दाखवलं. त्यात पुन्हा ‘शापित’ चे निर्माते प्रथमच चित्रपट निर्माण करत होते. त्यामुळे ह्या नव्या निर्मात्यांच्या समस्यांचा फडके यांना जुना अनुभव होता. त्या पूर्वीच्या अनुभवाने चांगलेच पोळलं असल्यामुळे त्यांनीही सावधगिरी घेतली असणार.... पण निर्मात्यांनी सर्व गोष्टींना होकार दिला.

‘शापित’ चित्रपट जसा वेगळा होता, तसंच त्या निर्मितीच्या वेळचं वातावरण देखील वेगळं होतं. कारण निर्मात्यांचा सुसंस्कृतपणा पदोपदी जाणवणारा होता. ह्या सगळ्याचं संघटित कामाचा परिणाम म्हणजे ‘शापित’ चित्रपट सर्वांग सुंदर झाला. ‘शापित’ ला मान्यता मिळाली आणि लोकप्रिय देखील झाला. पहिल्यावहिल्या चित्रपटाला असं यश मिळणं फारच दुर्मिळ असतं.

(सुधीर फडके)

मग एका दिवशी निर्माते सुधीर फडके यांच्याकडे गेले. अर्थातच चित्रपट यशस्वी झाल्याने वातावरण प्रसन्न होते. निर्माते फडके यांना म्हणाले, “बाबूजी, संगीत दिग्दर्शनाचा मोबदला म्हणून नव्हे, तर मानधन द्यायला आलो आहोत.” असं म्हणून त्यांनी कोरा चेक सुधीर फडके यांच्याकडे दिला आणि म्हटले, “तुम्हाला हवी ती रक्कम ह्यावर लिहा.”

बाबुजींनी एकवार निर्मात्यांकडे बघितलं आणि चेकवर रक्कम लिहिली फक्त १ रुपया!!

‘शापित’ चित्रपट निर्मितीच्या वेळी फडके यांनी अनोखे वातावरण अनुभवले. त्यात निर्मात्यांचा सुसंस्कृतपणा कारणीभूत आहे हे ओळखून त्यांनी दिलेली ही दाद होती!

चित्रपटसृष्टीत दिलेले चेक बाऊन्स होण्याची परंपरा मोठी असते. अगदी काही नाही, तर शेवटचा हप्ता बरेच निर्माते बुडवतात असा अनुभव खुद्द सुधीर फडके यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. पण अद्यापपर्यंत शापितचा १ रुपयाचा चेक हा प्रकार गुपितच राहिला होता. प्रशांत भूषण यांच्या १ रुपया दंडाच्या निमित्ताने बोभाटाच्या लेखकाची शापितच्या निर्मात्यांसोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा हा अनुभव निर्मात्यांनी सांगितला. हा अनुभव 'बोभाटा'वर शेअर करणार आहे हे कळल्यावर पण निर्मात्यांनी हरकत घेतली नाही.

या चित्रपटसृष्टीत देखल्या देवा दंडवत हा अलिखित नियमच आहे. पण किशोर कुमार यांच्याबद्दल एक गोष्ट इथे सांगायलाच हवी. 'आराधना' चित्रपटानंतर त्यांची पार्श्वगायक म्हणून चलती सुरु झाली. किशोरकुमार यांनी आराधनाच्या गाण्याच्यावेळी आणि त्यानंतर सदैव लता मंगेशकर यांच्यापेक्षा १ रुपया मानधन कमी घेतले. लता मंगेशकर यांच्या श्रेष्ठत्व आणि ज्येष्ठत्व यांना मान देण्याची त्यांची ही रीत होती.

राजकारणात माणसाचा खरा चेहेरा क्वचितच दिसतो असं म्हणतात. अशा राजकारणात केंद्रीय मंत्रीपद भूषवलेल्या सी.डी. देशमुखांची कहाणी तर इथे सांगायलाच हवी. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे नेहरू आकसाने बघत आहेत हे कळल्यावर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आचार्य अत्रे यांनी मराठाच्या अग्रलेखात "चिंतामणी देशाचा झाला कंठमणी" असे लिहून सन्मान केला. तर असे हे सी डी देशमुख नंतर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन(यूजीसी)चे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी जाहिर केले की "मी एकही रुपया मानधन घेणार नाही". या वाक्याला प्रचंद दाद मिळाली, पण माजी मंत्र्याच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार हे ओळखून पुढे ते म्हणाले, " मात्र माझे काम मी सोळा आणे करणार आहे".

तर वाचकहो अशा या १ रुपयाच्या कथा! पुढेही अशा अनेक कथा घडतच राहतील, पण जग रुपयाभोवतीच फिरत राहिल हे पण नक्कीच! Because whole thing is that के भैय्या सबसे बडा रुपैय्या!!

 

लेखक : रविप्रकाश कुळकर्णी

 

आणखी वाचा:

एक रुपयाचं बॉलीवूड कनेक्शन....वाचा हे १३ किस्से !!