स्वयंपाकातल्या एका चुकीमुळे आज १८० कोटी डॉलर्स उलाढाल असलेल्या चॉकलेटी चिप कुकीजचा जन्म कसा झाला?

लिस्टिकल
स्वयंपाकातल्या एका चुकीमुळे आज १८० कोटी डॉलर्स उलाढाल असलेल्या चॉकलेटी चिप कुकीजचा जन्म कसा झाला?

यापूर्वी आम्ही तुम्हाला इंटेलच्या मायक्रोप्रोसेसर चिपची गोष्ट सांगितली होती. आजही तुम्हाला एका चिपची गोष्ट सांगणार आहोत. पण ही चिप संगणकात नाही, तर बिस्किटात असते. थोडक्यात, आज आम्ही तुम्हांला तुमच्या-आमच्या आवडत्या चॉकोलेट चिप्स कुकीजची कथा सांगणार आहोत.

बिघडलेली गोष्ट बरेचदा फॅशन किंवा नव्या शोधाला जन्म देते असं गंमतीनं म्हटलं जातं. खाद्यपदार्थांचं विश्व तरी याला अपवाद कसं असेल? तिथेही अनेक चुका घडतात आणि नवे रुचकर पदार्थ जन्माला येतात. यापैकी पॉप्सीकल म्हणजेच आइसफ्रुटची कथा आम्ही तुम्हांला सांगितलीच होती. आपल्याला आवडणारे बटाट्याचे वेफर्स, आईसक्रीमचा कोन पण अशाच योगायोगातून जन्माला आले होते. चॉकलेट चिप कुकीजची निर्मिती पण एका चुकीतूनच झाली. आता सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण १९३० साल उजाडेपर्यंत चॉकलेट चिप कुकीज काय असतात हे जगाला माहिती नव्हतं. आणि साहजिकच आहे या पदार्थाला हे नावही मिळालं नव्हतं. म्हणून ही गोष्ट आता पूर्णच वाचू या. 

   या चॉकलेट चिप कुकीजच्या निर्मितीचं श्रेय रुथ वेकफील्ड या अमेरीकन बाईकडे जातं. त्याकाळी ,म्हणजे १९२४ साली महिलांसाठी गृहशास्त्र (होम सायन्स) हा खास विषय अभ्यासासाठी राखून ठेवलेला असायचा. रुथने हा कोर्स पूर्ण केल्यावर ती डाएटिशिअन म्हणून काम  करत होती. या दरम्यान तिचे लग्न केनेथ वेकफील्ड या गृहस्थाशी झालं. इथपर्यंत सगळी स्टोरी कशी एकदम नॉर्मल वाटते, नाही? पण इथे त्यांच्या स्टोरीला एक नवीन वळण मिळाले. त्यांनी बॉस्टनजवळ एक टोल हाउस आणि इन (खानावळ) चालवायला घेतले. टोल हाऊस इन म्हणजे आपल्याकडे जसा टोल प्लाझा असतो तसाच! टोल भरल्यावर लोक इथे येऊन आणि जेवून पुढच्या प्रवासाला लागायचे. पण या ताईंच्या हाताला गुण असल्याने त्यांच्याकडचे खाद्यपदार्थ लोकप्रिय झाले. खास म्हणजे इथे मिळणारे डिझर्ट म्हणजे जेवणानंतरची गोड डिश फारच फेमस होती.  या गोड डिशमुळेच कहाणीत एक नवा ट्विस्ट आला. 

 रुथच्या हातची 'बटर ड्रॉप डो' कुकीज त्यावेळी फारच प्रसिध्द होती. एक दिवशी रुथने 'बटर ड्रॉप डो' कुकीज बनवायला घेतली आणि लक्षात आले की त्यात टा़कायचे बेकर चॉकलेट  म्हणजे बिस्किटं बनवण्यासाठी लागणारी अतिशय हलकीशी गोड चॉकलेट पावडर संपली आहे. आता आली का पंचाईत? पण रुथ इतर गृहिणींसारखीच कल्पक होती. तिच्याकडे अँड्र्यू नेसले नावाच्या माणसाने दिलेला एक चॉकलेटचा बार शिल्ल्क होता. तो तिने पटकन कातरला आणि चॉकलेटचे तुकडे मैद्यात मिसळून टाकले. ते चॉकलेटचे तुकडे आपोआप विरघळतील आणि नेहमीसारख्या 'बटर ड्रॉप डो!!' कुकीज तयार होतील असा तिचा कयास होता. पण झाले भलतेच!! ते चॉकलेटचे तुकडे टाकले तसेच राहिले. भट्टीतल्या बाहेर आल्यावर बघते तो काय? खुशखुशीत कुकीजवर चॉकलेट तसेच राहिले होते, पण चवीला एकदम मस्त अशी नवीन कुकी तयार झाली होती. 

 लोकांना या कुकीज इतक्या आवडल्या की थोड्याच दिवसांत बॉस्टनच्या वृत्तपत्रात या कुकीजची रेसिपी प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर नेस्लेच्या चॉकलेट बारची मागणी अचानक वाढली. कारण सगळ्याच गृहिणींना या कुकीज बनवून बघायच्या होत्या. अचानक वाढलेल्या मागणीचं रहस्य नेस्ले कंपनीला कळलं तेव्हा त्यांनी ताबडतोब रुथ वेकफील्डसोबत एक करार केला. त्या कराराप्रमाणे नेस्लेच्या चॉकलेटबारच्या आवरणावर रुथच्या चॉकोलेट चिप्स कुकीजची, म्हणजे टोल हाऊस कुकीजची रेसिपी छापली जाणार होती. मोबदल्यात रुथला हवे तितके चॉकलेट जन्मभर मोफत मिळणार होते. यानंतर तर नेस्लेच्या चॉकलेटचा खप इतका वाढला की चॉकलेटच्या बार सोबत कातरण्यासाठी एक ब्लेड मिळायला लागली. काहीच दिवसात कुकीजमध्ये टाकायचे चॉकलेटचे तयार खडेही बाजारात आले. रुथ वेकफील्डच्या रेसिपी इतक्या लोकप्रिय झाल्या की तिचे “Ruth Wakefield's Recipes: Tried and True,”  नावाचे पुस्तकही प्रसिध्द झाले  आणि या पुस्तकाच्या आवृत्त्या छापाव्या लागल्या. 

दुसर्‍या महायुध्दात बोस्टनहून गेलेल्या सैनिकांचे नातेवाईक त्यांना या कुकीज पाठवायचे. त्यांनी त्या इतर सैनिकांना दिल्यावर अमेरीकेत चॉकलेट चिप्स कुकीजची मागणी अक्षरश: व्हायरल झाली.
आजही अमेरिंकेत चॉकलेट चिप्स कुकीजचा खप १८० कोटी डॉलर्सचा आहे.
असे अनेक गमतीदार किस्से आपण यानंतर वाचूच, पण तुमच्या सैपाकघरात अशाच गडबडीतून काहीतरी नवा पदार्थ तयार झाला असेलच.  कमेंटमध्ये नक्की सांगा !