एक खून केल्यानंतर नोटस काढून पुढचा खून करणाऱ्या अमेरिकेतल्या विकृत सिरियल किलर्सची गोष्ट!!

लिस्टिकल
एक खून केल्यानंतर नोटस काढून पुढचा खून करणाऱ्या अमेरिकेतल्या विकृत सिरियल किलर्सची गोष्ट!!

जग जितकं सुंदर आहे तितकंच भयाण विकृत गोष्टींनी भरलेलं आहे. माणसाच्या मनात एकदा का विकृतीने जन्म घेतला की त्यातून किती भयानक घटना आकार घेऊ शकतात याची कल्पनाही करवणार नाही. १९७०च्या दशकात अमेरिकेत अशाच दोन भयाण विकृत माणसांनी असा काही गदारोळ माजवला होता की अमेरिकन पोलीसही चक्रावून गेले. आपण खऱ्या गुन्ह्याचा तपास करतोय की खोट्या, याचंच कोडं त्यांना शेवटपर्यंत सुटलं नाही. नेमकं प्रकरण होतं तरी काय आणि याचे खरे सूत्रधार कोण होते? पाहूया या लेखातून.

हेन्री ली ल्युकास आणि ओटीस टूल या दोन नराधमांनी आपल्या कृत्याने संपूर्ण अमेरिकेस जेरीस आणले होते. हेन्री आणि ओटिस दोघांनाही बालपणी शारीरिक, मानसिक छळ सहन करावा लागला. यातूनच दोघांचीही मानसिकता बिघडत गेली. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी वाढले असले तरी दोघांची पार्श्वभूमी सारखीच असल्याने दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि प्रेमात पडले.

दोन चांगल्या व्यक्ती एकत्र आल्या की नक्कीच काही तरी भव्यदिव्य काम घडवून आणतात. पण, दोन वाईट व्यक्ती एकत्र आल्यावर काय होणार?

या दोघांनी अनेकांची हत्या केली. नुसती हत्याच नाही तर, बलात्कार करून खून करणे आणि आपण खून केलेल्या व्यक्तीचे मांस भाजून खाणे इतक्या टोकाला यांची विकृती गेली होती. पोलिसांच्या हाती लागल्यावर त्यांनी आपले सगळे गुन्हे कबूल केले. पोलिसांसमोर गुन्हे काबुल करताना दोघांनीही सांगितले की, त्यांनी आतापर्यंत एकूण ६०० लोकांचा खून केला आहे. यात तथ्य होते की स्वतःच्या क्रूरतेची बढाई होती याचा तपास मात्र पोलिसांनाही शेवटपर्यंत लागला नाही.

ओटिस आणि हेन्री एकेका गुन्ह्याची कबुली देत त्याप्रमाणे पोलीस त्यांच्या रजिस्टरमधील एकेक केस क्लोज करत. पोलिसांना आपल्या क्रूर कृत्ये रंगवून सांगताना या दोघांनी न केलेल्या गुन्ह्याचीही कबुली दिली आणि पोलिसांनी यांच्या कबुलीवर विश्वास ठेवून अनेक केसेस क्लोज केल्या. खरे तर अनेक गुन्ह्यातील गुन्हेगार कोणी वेगळेच होते, पण या दोघांनी केवळ पोलिसांना मूर्ख बनवण्यासाठी ही शाळा केली. अर्थात प्रत्येक गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी तो गुन्हा कसा आणि कुठे केला याचा तपास करण्यासाठी पोलीस त्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेत असत. त्यांनी खरे बोलावे म्हणून बाहेर नेल्यावर त्यांना स्ट्रीट फूडची ट्रिट देत असत. त्यामुळे दोघेही चांगलेच सोकावले होते, पोलिसांच्या या वागण्याचा फायदा घेत यांनी तब्बल ६०० गुन्ह्यांची कबुली देऊन टाकली. म्हणूनच त्यांना ‘कन्फेशन किलर्स’ असेही म्हटले जाते.

दुर्दैवाने ते खरे बोलत नसून त्यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे नंतर उघडकीस आले. त्यांच्या या भूलभुलैयाच्या खेळात एक विचित्र आणि भेसूर सत्य दडले होते.

हेन्री ली आणि ओटिस टूल यांनी ६०० नसले तरी १०० जणांचा तरी खून केलाच होता. हे खून करताना ते फारसा विचार करत नसत. सावज कसा आणि कुठे शोधायचा याबद्दलही त्यांचा आधीच काही प्लॅन झालेला नसायचा. त्यांच्या या गलिच्छ कृत्यात लहान, मोठे, वृद्ध, स्त्री, पुरुष असा कोणताही भेदभावही नव्हता.

लुकास यांनी टूल या दोघांच्याही आयांनी लहानपणी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला होता. दोघीही आपल्या मुलांना मुलींसारखा पोशाख करून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडायच्या. वयाच्या १० व्या वर्षापूर्वीच त्यांनी अशा प्रकारचे भयाण लैंगिक शोषण सहन केलेले असल्याने त्यांच्या बालमनातच विकृतीने घर केले असेल तर त्यात नवल ते काय? १४ व्या वर्षापर्यंत दोघांनीही आपल्या आयुष्यातील पहिला खून केला होता.

१९७६ साली त्यांची पहिली भेट एका कॅन्टीनमध्ये झाली. एकसारख्या परिस्थितीतील बालपण आणि खून करण्याची ओढ या दोन समान गोष्टींमुळे ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी मिळून खुनाचे सत्र आणखीतीव्रतेने सुरू केले. ल्युकासने तेविसाव्या वर्षी आपल्या आईचा खून केला होता. त्यासाठी त्याला १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षादेखील झाली होती. टूलची कहाणी काही वेगळी नव्हती. त्याचाही लहानपणी अनेकांनी लैंगिक छळ केला होता. १४ व्या वर्षी असाच एक वाटसरू त्याच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असताना टूलने त्याच्याच कारखाली त्याला चिरडून मारला. अशा रीतीने त्या दोघांना जी रक्ताची चटक लागली ती कायमची! खून करणे हा जणू त्यांच्यासाठी एक छंदच होता आणि जेव्हा दोघे एकत्र आले तेव्हा तर त्यांनी ताळतंत्रच सोडले. जाऊ तिथे खून करू हाच जणू त्यांचा शिरस्ता बनला होता.

१९७०च्या दशकात अमेरिकेच्या एकूण २६ राज्यातून ते फिरले. जिथे जातील तिथे कुणाला ना कुणाला ते मारून टाकत असत. वाटसरू, वेश्या, स्थलांतरीत अशी एकटी पडलेली लोकं विशेषत: त्यांची शिकार ठरत. खून केल्यानंतर तो खून कसा केला याच्या ते नोट्स काढत. काही पुरावे मागे राहिले का याचा अभ्यास करत. खून करताना काही चुका झाल्या का यावर चर्चा करत. खून करताना त्यांना कशी मजा आली याबद्दलही ते अगदी उघडउघड बोलत. पुढच्या वेळी कोणत्या चुका टाळायच्या यावरही त्यांची चर्चा होत असे. म्हणजे खून हा जणू त्यांच्यासाठी एक अभ्यास विषयच होता.

टूल आणि ल्युकास यांनी केलेला एक मोठा खून म्हणजे अमेरिकेचा प्रसिद्ध वक्ता आणि अँकर जॉन वॉल्श याचा ६ वर्षाचा मुलगा ॲडम वॉल्श याचा. ॲडम पार्किंग लॉटमध्ये खेळत असताना टूलने त्याला उचलला आणि त्याचे तुकडे करून त्याचे धड एका कॅनॉलमध्ये फेकून दिले. पोलिसांच्या तपासात त्याने स्वतः ही माहिती दिली. पोलिसांचा या गोष्टीवर अजिबात विश्वास बसला नाही. कारण ॲडमच्या खुनामुळे अमेरिकेत मुलांच्या सुरक्षिततेवरून मोठाच गदारोळ माजला होता. या प्रकरणावरून अमेरिकेत लहान मुलांच्या संरक्षणासाठी नवा कायदा आणला गेला. टूलने हेही सांगितले की त्याने ॲडमचे धड टाकून दिले आणि त्याचे मुंडके गाडीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर तो खूप दूरवर गेला आणि त्याच्या लक्षातच नव्हते की आपल्या गाडीत असे एक मुंडके पडले आहे. खूप वेळाने त्याच्या लक्षात आल्यानंतर ते मुंडकेही त्याने असेच कुठेतरी फेकून दिले.

दोघांनीही पोलीस तपासात दिलेल्या माहितीनुसार त्यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना कधीच पश्चाताप झाला नाही. उलट त्यांना हे सगळे करण्यात मजा येत होती. दोघांनी मिळून नेमके असे किती खून केले असतील याचा ठोस आकडा सांगणे कठीण आहे. त्यांनी जरी ६०० खून केल्याची बढाई मारली असली तरी प्रत्यक्षात हे सिद्ध होऊ शकले नाही. जवळपास डझनभर खुणांचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी ठरले. दोघांनाही फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. १९९६ मध्ये टूलचे लिव्हर फेल झाल्याने तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला तर ल्युकास २००१ साली तुरुंगात असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने गेला.

त्या दोघांसोबत त्यांच्या क्रूरतेची भयाण कथाही संपून गेली.

मेघश्री श्रेष्ठी