युद्धभूमीवर अचानक दोन्हीकडचे सैनिक आपापली हत्यारे टाकून गाणी गाऊ लागले, आपसांत गप्पा मारू लागले, खेळू लागले, तर..??
तर काय, कल्पनाच हो! किती केलं तरी असलं काही प्रत्यक्षात कुठे घडणार आहे का? असा विचार तुमच्या मनात आला तर त्यात काही नवल नाही सोडा. पण तुम्हाला माहितीये का? पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मन आणि इंग्लंडच्या सैन्याने ही कल्पना सत्यात उतरवली होती. आता हे वाचून थोडे आश्चर्य वाटेल. कारण ज्या महायुद्धाने जगाला हिंसेचा, क्रौर्यचा अमानुषतेचा नंगानाच दाखवला त्या महायुद्धात अशी काही सुखद घटना घडली असेल यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही, पण प्रत्यक्षात हे घडले होते.
१९१४ साली पहिल्या महायुद्धाला नुकतीच सुरुवात झाली होती. या युद्धाने आधीच लाखो बळी घेतले होते. रक्ताचे पाट वाहिले होते. कित्येक संसार उध्वस्त झाले होते, सगळीकडचा हाहा:कार पाहून लोकांचा जगण्यावरचा विश्वास उडाला होता, अशात घडलेल्या त्या एक घटनेने ही दाखवून दिले की सत्तालोलुप साम्राज्यवाद्यांनी कितीही अशांतता पसरवली तरी मुळात शांती हीच मनुष्याची मूलभूत गरज होती, आहे आणि राहिल.


