'वंशद्वेष' ज्याला आपण इंग्रजीत 'रेसिझम' म्हणतो तो या ना त्या कारणाने समोर येतचं असतो. विश्वास बसत नसेल तर कोणतीही फेअरनेस क्रीमची जाहिरात बघा. या जाहिरातीत काळा रंग म्हणजे जणू धब्बाच दाखवला जातो. त्या गोऱ्यागोमट्या पोरी, लख्ख पांढऱ्या दिसणारी त्वचा, जणू त्या या जगातल्या नाहीच. त्या कृत्रिम आणि भंपक जगातली सौंदर्याची व्याख्या पटण्यासारखी नसतेच.
सुदानची ‘न्याकिम गेटवे’ नावाच्या एका मॉडेलने सौंदर्याची ही टिपिकल व्याख्या बदलून आपल्या गडद काळ्या रंगालाच आपलं खरं सौंदर्य बनवलंय आणि तिच्या रंगावरून तिला डिवचणाऱ्या लोकांची थोबाडं बंद केली आहेत. मंडळी तिच्या रंगासाठी तिला ‘क्वीन ऑफ डार्क म्हंटलं जातं. इंटरनेटवर ती तिच्या बेधडक वागण्यामुळे प्रसिद्ध आहे.
मॉडेलींगच्या क्षेत्रात आपला रंग अडचणीचा विषय होऊ न देता, त्याच काळ्या रंगला तिने आपली ढाल बनवलीये. तिच्या मते तिने कितीही पैसा कमावला तरी ती आपल्या रंगाशी छेडछाड करणार नाही. देवाने बहाल केलेल्या रंगाचा आदर केला पाहिजे असं तिचं म्हणणं आहे.
तिला रंगावरून प्रश्न विचारणाऱ्यांची तोंडे ती आपल्या हजरजबाबी स्वभावामुळे बंद करते. अमेरिकेत मॉडेलींगसाठी आल्यानंतर तिला रंगामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. लोक तिच्यावर हसले, प्रश्नांचा भडीमार केला. एक वेळ अशी आली की तिने सौंदर्य प्रसाधने वापरण्याचा विचार देखील केला होता, पण शेवटी तिने असलं काहीही करायचं नाही असं ठरवलं.
‘तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही आतून किती सुंदर आहात हे महत्वाचं आहे’ हे तिचं वाक्य अश्या अनेकांना प्रेरणा देत आहे जे आपल्या रंगामुळे आत्मविश्वास गमावून बसलेत !
अशा या क्वीन ऑफ डार्कला बोभाटाचा सलाम !!!


