याला म्हणतात नशिब ! लस घेतली आणि सोबत करोंडोची लॉटरीही लागली? काय आहे ही गोष्ट?

लिस्टिकल
याला म्हणतात नशिब ! लस घेतली आणि सोबत करोंडोची लॉटरीही लागली? काय आहे ही गोष्ट?

कोविड लसीकरण अजूनही जगभरात १०० टक्के पूर्ण झाले नाही. या रोगाला मुळापासून नष्ट करण्यासाठी जगभर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी म्हणून अनेक ठिकाणी आकर्षक ऑफर्सही दिल्या जात आहेत. समजा तुम्हाला कोणी हे सांगितले की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी एखाद्याला लस दिली आणि त्यातून त्याला करोडो रुपये बक्षीस मिळाले, तर तुमचा विश्वास बसेल का? हे खोटेच वाटेल ना! प्रत्यक्षात हे घडले आहे, तेही ऑस्ट्रेलियातील एका २५ वर्षीय महिलेसोबत! जाणून घेऊया, हे संपूर्ण प्रकरण काय आहे..

 

२५ वर्षांच्या या भाग्यवान मुलीचे नाव जोआन झू आहे. गेल्या महिन्यात मिलियन डॉलर व्हॅक्स लॉटरीमध्ये तिने भाग घेतला आणि जॅकपॉट जिंकला. या ऑफरमध्ये ३० लाख लोकांना लसीकरणाच्या बदल्यात जॅकपॉट जिंकण्याची संधी देण्यात आली होती. 'द मिलियन डॉलर वॅक्स अलायन्स लॉटरी सिस्टम' नावाची मोहीम सध्या ऑस्ट्रेलियात सुरू आहे. जोआननेही त्यात स्वत:ची नोंदणी केली होती. या सरकारी लसीकरणात सहभागी झाल्यानंतर त्यांना लकी ड्रॉमध्ये ७.४ कोटी रुपयांची लॉटरी लागली. हे कळताच तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.
जोआनचा अजूनही विश्वास बसत नाही की ती करोडपती झाली आहे. हे सर्व तिच्यासाठी स्वप्नासारखे आहे.

लॉटरीत जेव्हा तिचे नाव आले तेव्हा जोआनला फोन करण्यात आला. पण ती काही कारणास्तव फोन उचलू शकली नाही. नंतर तिने परत फोन केला तेव्हा ती जिंकली असल्याचे कळाले. चेक मिळाल्यानंतर तिने कुटुंबातील सदस्यांना भेटवस्तू देण्याचे ठरवले आहे, तसेच ती रक्कम भविष्यासाठी गुंतवणूक करणार आहे.

या मोहिमेमुळे ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये लसीकरणाचा वेग चांगलाच वाढला आहे. पहिल्या डोसची टक्केवारी ७८.५ वरून ८८.३ पर्यंत वाढली आहे. तसेच १६ वर्षांवरील ८० टक्के संपूर्ण लसीकरण (दोन्ही डोस) पूर्ण झाले आहे. ह्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

भारतातही अशी मोहीम राबवली तर फायदा होईल काय?

शीतल दरंदळे