आग्र्याचा संगमरवरी ताजमहाल पाहिला असेल, पण काश्मीरमधला हा बर्फाचा ताजमहाल पाह्यलात का?

आग्र्याचा संगमरवरी ताजमहाल पाहिला असेल, पण काश्मीरमधला हा बर्फाचा ताजमहाल पाह्यलात का?

गेल्या वर्षी काश्मीरमधील गुलमर्गमध्ये बर्फाचे इग्लू रेस्टॉरंट उघडले त्याबद्दल तुम्ही बोभाटावर वाचलेच असेल. त्याच अनुषंगाने पर्यटकांसाठी एक आकर्षण म्हणून यावर्षी ताजमहालची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे आणि तीही चक्क बर्फाची. होय! सध्या जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. अनेक पर्यटक याकाळात बर्फवृष्टी अनुभवण्यासाठी भेट देत असतात. काश्मीरमधील गुलमर्ग येथील जगप्रसिद्ध स्की-रिसॉर्टमध्ये जगातील एक आश्चर्य मानलेल्या ताजमहालची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. गुलमर्गमधील एका खासगी रिसॉर्टमध्ये बर्फापासून बनवलेल्या ताजमहालची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. ही बर्फाची प्रतिकृती पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे..

The Grand Mumtaz Hotels & Resorts असे या रिसॉर्टचे नाव आहे.या रिसॉर्टचे व्यवस्थापक सत्यजित गोपाल यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, इथल्या चार कर्मचाऱ्यांच्या टीमने हे बर्फाचे शिल्प सुमारे १०० तासांत म्हणजे १७ दिवसांत बनवले. तिथले तापमान तेव्हा उणे १२ अंश सेल्सिअस होते. हा बर्फाचा ताजमहाल २४ फूट x २४ फूट आहे. तर याची उंची १६ फूट उंच आहे. येथे आलेल्या पाहुण्यांना तिथे पारंपारिक काश्मिरी कहावा म्हणजेच चहा देण्यात येतो. खास काही सेल्फी पॉइंट ही तिथे उभारले आहेत. या ठिकाणी भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. तसेच ते चोवीस तास खुले असते. रात्रीच्या वेळी तिथे खास रोषणाईमुळे ताजमहल अजूनच सुंदर दिसतो.

काश्मीरमध्ये पहिल्यांदाच बर्फाचा बनलेला ताजमहाल स्थानिक लोकांसोबतच रिसॉर्टला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तिथले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याचे फोटो पाहून नेतकरी खूप सुंदर अश्या प्रतिक्रिया देत आहेत.

संगमरवरी ताजमहल तर अनेकजण पाहतात, पण खास बर्फाचा ताजमहल पाहण्याची इच्छा असेल तर काश्मीरला भेट द्यायलाच हवी. तिथल्या निसर्गाचा आनंद घेतानाच ताजमहल ही पाहून घ्या.

शीतल दरंदळे