नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करायला सर्वजण उत्सुक असतील. या वर्षात म्हणजे जानेवारी पासून अनेक नियमांत बदल होणार आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला त्याची झळ बसणार आहे. जानेवारीपासून रेडिमेड कपडे, बूट, चप्पल खरेदी करणे आणि ऑनलाइन अन्न ऑर्डर करणे खूप महाग होणार आहे. आज पाहूयात कुठल्या उत्पादनावरील दर कसे महागणार आहेत.
जानेवारी २०२२ पासून तयार उत्पादनांवरील जीएसटी दर ५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. कापडावरील जीएसटी दर ५ टक्क्यांवरुन वाढून १२ टक्के असेल. त्याचप्रमाणे कोणत्याही किमतीच्या बनवलेल्या कपड्यांवरील जीएसटीचा दरही १२ टक्के असेल. यापूर्वी १००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर ५ टक्के जीएसटी लागू होता.
आपण जे कपडे घालतो फक्त तेच नाही, तर सर्व कापडाचे प्रकार जसे विणलेले कापड, सिंथेटिक, पाइल फॅब्रिक्स, ब्लँकेट, तंबू, टेबलक्लॉथ याच्या किंमतीही वाढणार आहेत. कारण हा जीएसटी दर ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. म्हणूनच नवीन वर्षापासून तुम्हाला तयार कपडे घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
कपड्यांबरोबरच फुटवेअरवरच्या किंमती ही वाढणार आहेत. यापूर्वी १००० रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या फुटवेअरवर ५ टक्के दराने जीएसटी आकारला जात होता. आता तो वाढून १२ टक्के होणार आहे. त्यामुळे चपला, बूट महागणार आहेत.
आधीच कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडले आहे, आता या जीवनावश्यक वस्तू महाग झाल्यामुळे त्याची अजून झळ बसणार आहे.
शीतल दरंदळे
