पंडिता रमाबाईंचा जन्म तर आनंदीबाईंच्याही आधीचा, सन १८५८चा. त्यावेळेसही स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल काही वेगळं चित्र नव्हतं. स्त्रियांना संस्कृत आणि वेद शिकवण्यातर तर भलतीच बंदी होती. तरीही लोकांचा रोष पत्करून रमाबाईंचे वडिल पंडित अनंतशास्त्री डोंगरेंनी रमाबाईंच्या आईला आणि रमाबाईंना सारं काही शिकवलं होतं. इतकंच नाही, तर रमाबाईंवर लग्न करण्याचा दबावही आणला नाही. त्या सोळा वर्षांच्या असतानाच त्यांचे आईबाबा वारले. त्या काळात सोळा वर्षांची विनालग्नाची मुलगी असणं काय होतं याची आपण कल्पनाच करू शकत नाही. आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर ही मुलगी तेव्हा भारतभर फिरली. कलकत्त्यात त्यांचं भाषण ऐकण्यासाठी खूप लोक जमले होते. इथंच त्यांना ’सरस्वती’ आणि ’पंडिता’ या पदव्या मिळाल्या. स्त्रिशिक्षणाला मान्यता नसण्याच्या काळात एका स्त्रीची बुद्धिमत्ता अशी जाहिरपणे गौरवली गेली होती. इतकंच काय, त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू इतक्या सार्या भाषा चांगल्यात माहित होत्या. पुढं चालून रमाबाईंनी कोलकत्यातील बिपिन मेधावी या वकिलांशी लग्न केलं. हे लग्न तेव्हा बरंच गाजलं. कारण हा आंतरजातीय, आंतरभाषिक असा विवाह तर होताच. तेव्हा जातपात आजच्यापेक्षा जास्त मानत आणि रमाबाईंचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे!! दुर्दैवाने मेधावी लग्नानंतर दोनच वर्षांत वारले.
त्यानंतर रमाबाई आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्याला येऊन राहिल्या. इथं येऊन त्यांनी बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या वाईट चालीरीती समाजातून कायमच्या रद्द व्हाव्यात म्हणून रमाबाईंनी ’आर्य माहिला समाजा’ची स्थापना केली. या आर्य समाजाच्या बर्याच ठिकाणी शाखाही निघाल्या. रमाबाईंनी विधवांकरता ’शारदा सदन’, ‘प्रीतिसदन’, आणि ‘शांतिसदन’ नावाच्या संस्था काढल्या. स्त्रियांना त्यांच्या पायावर उभं राहाता यावं म्हणून त्यांना पैसा मिळवून देणार्या व्यवसायांचं शिक्षण दिलं. केशवपन या वाईट प्रथेविरूद्ध लढा दिला. त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’, ‘युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ आणि ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ ही पुस्तकं लिहिली. इंग्लंड आणि अमेरिका या देशांतून भारतातल्या लोकांच्या अडीअडचणी, हिंदू बालविधवांचे प्रश्न याबद्दल व्याख्यानं दिली. इतकंच काय, त्यांनी इंग्लंडच्या एका कॉलेजात संस्कृत शिकवलं. रमाबाईंनी मूळ हिब्रू भाषेत लिहिलेल्या बायबलचं मराठी भाषांतर केलं. असं म्हणतात, की आजही तीच ती रमाबाईंनी भाषांतरित केलेली मराठी बायबल्स वापरली जातात.