नावांच्या या अजब गजब जगात काही लोकांनी त्यांच्या मुलांची नावे राजांच्या नावावरून ठेवली आहेत. रोहतासमधल्या कैमूर जिल्ह्यातील कुदारा बाजार मध्ये राहणाऱ्या अनुराधा रस्तोगी यांनी आपल्या चारही मुलांची नावे चंद्रगुप्त, स्कंदगुप्त, हर्षगुप्त आणि समुद्रगुप्त अशी ठेवली आहेत. चंद्रगुप्त, स्कंदगुप्त आणि समुद्रगुप्त हे गुप्त वंशाचे प्रमुख राजे होते. गुप्त कालीन भारताला प्राचीन इतिहासाचे सुवर्णयुग म्हणतात. कारण याच काळात विज्ञान साहित्य आणि कला यांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला. अनुराधा म्हणतात, “आम्ही मुलांची नावे राजांच्या नावावरून यासाठी ठेवली की त्यांचे यश या सर्व राजांसारखे जगभर पसरावे.”
अनुराधा यांना जसे आपल्या मुलांना यश आणि ताकद मिळावी असे वाटते तसेच बिहारच्या पश्चिमी भागातील चंपारण जिल्ह्यातील सिसावा बसंतापूर गावातील हवालदारांच्या घरात पाच देश राहतात. अमेरिका, आफ्रिका, रुस (रशिया), जपान आणि जर्मनी. यामधील रुस शर्मा यांचा मृत्यू वयाच्या ५२ व्या वर्षी झाला, तर त्यांचे भाऊ जर्मनी शर्मा यांचा मृत्यू वयाच्या ५५ व्या वर्षी झाला. या भावांतील सुतार असणारे जपान शर्मा असे सांगतात की त्यांचे काका अकलू शर्मा हे १९५० मध्ये फौजेत भारती झाले. फौजेत राहून त्यांनी बऱ्याच देशांविषयी ऐकले व गावी येऊन आपले मोठे भाऊ चंनर शर्मा यांच्या मोठ्या मुलाचे नाव अमेरिका ठेवले. याच प्रमाणे त्यांनी पुढील मुलांचीदेखील नावे ठेवली. या नावांमुळे हे कुटुंब त्यांच्या गावात प्रसिध्द आहे. या भावांविषयी एक मजेदार किस्सा सांगितला जातो. गावात त्यांचे काही लोकांबरोबर भांडण झाले तेव्हा काही लोक या भावांविरोधात तक्रार घेऊन पोलिसांकडे गेले. पण पोलिसांनी या देशांविरोधात तक्रार नोंदवून घ्यायला साफ नकार दिला. ते म्हणाले आम्ही या देशांविरोधात कोणतीच कारवाई करू शकत नाही.