मजा, मस्ती, भटकंती करायच्या वयात त्यांनी देशासेवत जायचं स्वप्न घेऊन दिवसरात्र मेहनत केली. गुलाबी सुखस्वप्नात रमून जाण्याऐवजी ते सीमेवर डोळ्यात तेल घालून उभे राहिले. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं आख्खं आयुष्य बाजूला सारून निघालेले हे वीर जवान परत आपल्या गावी आले ते 'शहीद' होऊनच. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या २०जवानांपैकी हे ४वीर आपल्या महाराष्ट्रातले होते..
विकास जनार्दन कुळमेथे

यवतमाळ जिल्ह्यातील पूरड या गावचा विकास दोन महिन्यापूर्वीच आपल्या गावी येऊन गेलेला. घरची परिस्थिती अत्यंत सामान्य आणि घरात विकास एकुलता एक मुलगा असूनही त्याने देशेसेवेसाठी सेनेत जाण्याचा निर्णय घेतला. आठ महिन्यांपूर्वीच विकासला एक गोड मुलगी झाली आहे.
चंद्रकांत शंकर गलांडे

सैनिकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातील ’जाशी’ गावचे सुपुत्र चंद्रकांत गलांडे सेनेत लान्स नायक पदावर होते. चंद्रकांत यांना दोन लहान मुले असून त्यांचे दोन्ही भाऊसुद्धा लष्करात आहेत. गावालगतच असलेल्या घरी त्यांची पत्नी मुलांसोबत राहायची. चार दिवसांपुर्वी त्यांनी आईला केलेला फोन हा त्यांचा शेवटचा फोन ठरला.
संदिप सोमनाथ ठोल

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील खडांगणी या खेडेगावचा संदिप चार वर्षांपूर्वीच सैन्यात भरती झाला होता. संदिपचे आई-वडील गावाकडे शेती करायचे. २५ वर्षांच्या संदिपचं पुढच्याच महिन्यात लग्न होतं. संदिप शहिद झाल्याच्या बातमीने अवघ्या नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
पंजाब जानराव उईके

२७ वर्षे वय असलेल्या पंजाब उर्फ विकासचं अजून लग्नही झालं नव्हतं. वडिलांच्या ३३वर्षांच्या लष्करी सेवेनंतर विकासनेही हीच देशसेवेची परंपरा पुढे सुरू ठेवली. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर या गावचा विकास शहिद सेनेत शिपाई पदावर होता. विकासच्या पश्चात आई वडील आणि भावंडे आहेत.
देशासाठी बलिदान देणार्या या वीर जवानांच्या चेहर्यावर मृत्यूनंतरही जणू देशसेवेच्या समाधानाचं स्मित होतं. भारतमातेच्या या महान सुपुत्रांना बोभाटा परिवार आणि संपूर्ण देशाकडून श्रद्धांजली!!
