सध्या वसंत ऋतूचा काळ सुरू आहे. वसंत हा सृजनाचा काळ. या दिवसात रुक्ष थंडी संपून वातावरण उबदार होऊ लागलेलं असतं आणि हळूहळू उष्णतामान वाढत जाऊ लागतं. हा काळ आरोग्याच्या दृष्टीने समजून घेतला तर स्वास्थ्यप्राप्ती होणं सहज शक्य होतं.
पूर्वीच्या हेमंत आणि शिशिर ऋतूंमध्ये थंड वातावरणामुळे.शरीरात कफ साठतो. हा कफ वसंतात उष्णतामान वाढू लागताच पातळ होऊन आपला जाठराग्नी क्षीण करतो. आता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपलं आरोग्य आपल्या पचनशक्तीवर आणि पचनशक्ती पाचकाग्नीच्या म्हणजेच जाठराग्नीच्या ताकदीवर अवलंबून असतं. वसंत ऋतूमध्ये कफ विकृतीमुळे मंद झालेला जाठराग्नी अनेक रोग निर्माण करतो. म्हणून या काळात सर्वप्रथम वाढलेल्या कफाचा बंदोबस्त करायला हवा.
आपल्या शरीरातील वात-पित्त-कफ या तीन दोषांमधला कफ दोष वैशिष्ठ्यपूर्ण आहे. या कफ दोषाचं पोषण पाण्यापासून होतं. तेव्हा कफाची दूषितावस्था दूर करण्यासाठी पाण्याचं माध्यम उत्तम ठरतं. असं असल्यामुळेच या काळात पाण्याचे सेवन पुढील प्रकारात करावं..
1. शृंगवेराम्बु :- सुंठीचं पाणी

शृंगवेर म्हणजे सुंठ. शृंगबेराम्बु म्हणजे सुंठीचं पाणी. भांड्यात 500 मिली पाणी घेऊन त्यात सुंठीचा पेरभर (सुमारे 1 इंच) तुकडा ठेचून टाकावा. मंद विस्तवावर आटवून सुमारे 350 मिली पाणी शिल्लक राहिल्यावर गाळून घ्यावं. हे पाणी अर्थातच जरा तिखट लागतं.
2. साराम्बु :- कात मिसळलेलं पाणी
सार म्हणजे आपण ज्याला कात म्हणतो; जो खदिराच्या बुंध्यापासून बनवतात. कात मिसळलेलं पाणी म्हणजे साराम्बु. सामान्यतः शुद्ध काताचं पाण्यात विरघळण्याने पाणीे लालसर रंगाचं आणि चवीला कडसर बनतं. सुमारे १२० मिली पाण्यात ५ ग्रॅ कात मिसळाल्यास योग्य गुणाचे साराम्बु बनते.

3. मध्वम्बु :- मधाचे पाणी
मधु म्हणजे मध. 2 चमचे शुद्ध मध 150 मिली पाण्यात टाकून तयार झालेल्या पाण्याला मध्वम्बु असं म्हणतात. मध हा चवीला गोड असला तरी त्याचा मूळ रस ’कषाय’ म्हणजे तुरट असतो. असं असूनही मध्वम्बु चवीला गोडच असतं.

4. जलदाम्बु :- नागरमोथ्याच्या मूळांचे पाणी
जलद म्हणजे मुस्ता. मराठीत याला नागरमोथा म्हणतात. भातशेतीच्या बांध्यांवर लव्हाळी लागतात तो नागरमोथा. याची मुळं अौषधी गुणधर्माची असतात. नागमोथ्याच्या मुळांच्या गाठी सुमारे 20 ग्रॅ. घेऊन थोड्या चेचून सुमारे 350 मिली पाण्यात रात्रभर भिजवून ठेवाव्यात. दुसर्या दिवशी ते पाणी मंद विस्तवावर आटवून निम्मं (170-180 मिली) करावं आणि गाळून घ्यावं. हे जलदाम्बु चवीला कडसर लागतं.

तुमच्या लक्षात येईल की सामान्यतः पाण्याचा रस मधुर असतो. ज्या दोषाच्या विकृतीमुळे स्वास्थ्य हिरावलं गेलंय, तो कफ, पाणी आणि पाण्याच्या मधुर रसामुळे वाढतो. पण त्याचवेळेला हवेत उष्णता अधिक असल्याने कुणालाही पाणी प्यावं तर लागणारच. मग कफाच्या विकृतीत वाढ न करता पाणी प्यावं तर प्यावं कसं, या अनावस्था प्रसंगातून आयुर्वेद वरील युक्तीने आपल्याला मार्ग दाखवतो. प्यायचं पाणी जर कडू, तिखट किंवा तुरट रसाचं असेल तर हे रस कफाला पोषक नसल्याने त्याचा क्षय करवतात अाणि पर्यायाने अग्नी वाढवण्याचं काम करतात.
वसंत ऋतूमध्ये उष्म्यापासून रक्षण व्हावं म्हणून कैरीचं पन्हं, कोकमाचं सार किंवा चिंचेचं पानक घेत असतानाच, रोज येता-जाता-जेवता शृंगवेराम्बु, साराम्बु, मध्वम्बु आणि जलदाम्बु पेयाचं पान केल्यास वसंत ऋतूतही स्वास्थ्यलाभ करून घेता येऊ शकेल.




