व्हिएतनामी सैनिकांना धडकी भरवणारा, ३० सेकंदांत १६ शत्रूंना ठार मारणारा चार्ल्स चक कोण होता?

लिस्टिकल
व्हिएतनामी सैनिकांना धडकी भरवणारा, ३० सेकंदांत १६ शत्रूंना ठार मारणारा चार्ल्स चक कोण होता?

१९५५ साली दक्षिण व्हिएतनाम आणि उत्तर व्हिएतनाम मध्ये झालेले युद्ध हे दुसरे इंडोचायना युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. या युद्धात सोव्हिएत युनियन आणि चीन हे देश उत्तर व्हिएतनामच्या बाजूने होते, तर दक्षिण कोरिया, अमेरिका हे देश दक्षिण कोरियाच्या बाजूने होते. याशिवाय कम्युनिस्ट विरोधी मित्र राष्ट्र म्हणून फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया आणि थायलंडसारख्या देशांनीही या युद्धात सहभाग घेतला होता. १९५५ पासून सुरु झालेल्या या युद्धाला १९७५ मध्ये पूर्णविराम मिळाला.

अमेरिकेन सैन्याने या युद्धात चांगलीच कामगिरी बजावली होती. अमेरिकन स्नायपर (दूरवरून अचूक नेम साधून शत्रूस ठार मारणारा) चार्ल्स म्यूहिनी (ज्याला चार्ल्स चक म्हणूनही ओळखले जाते) ने अवघ्या ३० सेकंदांत १६ शत्रूंचा वेध घेतला होता. त्याचे नाव ऐकून आजही व्हिएतनामी सैनिकांना धडकी भरत असेल. म्हणूनच जगातील सर्वात खतरनाक स्नायपर ही बिरुदावली आजही चार्ल्सच्या नावावर कायम आहे.

चार्ल्स चकच्या या पराक्रमाची गोष्ट खास बोभाटाच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

चार्ल्सचे वडीलही लष्करात होते. चार्ल्सने लहानपणापासूनच आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लष्करात भारती होण्याचे स्वप्न पहिले. यासाठी त्याने लहानपणापासूनच तयारी सुरु केली. १९६७ साली चार्ल्सचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नौदलाचे प्रशिक्षण घेऊ लागला. इथेच त्याला स्नायपर होण्याचेही प्रशिक्षण मिळाले. चार्ल्सने प्रशिक्षण घेत असतानाच भरपूर सराव केला होता. त्याचा अचूक निशाणा पाहून सर्वजण थक्क होत असत. आता त्याला आपले हे कौशल्य आजमावण्याची संधी हवी होती. अशातच व्हिएतनाम युद्धावर त्याची नेमणूक होत असल्याचे कळवण्यात आले. चार्ल्ससाठी हा क्षण आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता, कारण देशाच्या वतीने लष्करात योगदान देण्याचे त्याचे स्वप्न आता पूर्ण होणार होते.

दा नांग परिसरात अमेरिकन लष्कराचा तळ होता. या तळाला अमेरिकन लष्कराने “एरीझॉन टेरीटरी” हे नाव दिले होते. उत्तर व्हिएतनामची एक तुकडी या अमेरिकन लष्करी तळावर हल्ला करण्याची तयारी करत होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने आकाश काळवंडून गेले होते. ढगाळ वातावरणात हवाई दलाला कारवाई करणे शक्य नव्हते. अमेरिकन तळाकडे येण्यासाठी या व्हिएतनाम सैन्याला एक नदी पार करावी लागणार होती. व्हिएतनामी सैन्य हे नदी पार करत असेल तेव्हाच त्यांच्यावर निशाणा साधायाचा असा अमेरिकन लष्कराचा प्लान होता.

नदी पार करून येणाऱ्या या व्हिएतनामी सैनिकांना हे माहीत नव्हते की पलीकडे त्यांचा वेध घेण्यासाठी एक अमेरिकी स्नायपर झुडुपात लपून बसला आहे. चार्ल्सने एम१४ सेमीऑटोमॅटिक रायफल आणि स्टारलाईट स्कोप घेतला. रात्रीच्या अंधारातही यामुळे नेम लावणे सोपे जाते आणि एवढ्याच हत्यारानिशी त्याने आपली जागा पक्की केली.

काही तास लोटल्यानंतर उत्तर व्हिएतनामी सैनिक नदी पार करू लागले. व्हिएतनामी सैनिकांच्या तुकडीचा म्होरक्या नदीत उतरू लागला. त्याने आजूबाजूच्या परिस्थितीचा कानोसा घेतला आणि आपल्या तुकडीला सगळं काही ठीक असल्याचा इशारा केला. त्याच्यामागून त्याची संपूर्ण तुकडीही नदीत उतरू लागली. चार्ल्सला आपल्या जागेवरून त्यांच्या हालचाली स्पष्ट दिसत होत्या, पण त्याने अजिबात घाई केली नाही. व्हिएतनामी सैनिकांची संपूर्ण तुकडी नदीच्या मध्यावर म्हणजेच खोल पाण्यात येईपर्यंत त्याने वाट पहिली. त्याला हव्या त्या ठिकाणी सैनिक आल्यानंतर त्याने आपल्या रायफलमधून असा काही नेम धरला की एकामागून एक व्हिएतनामी सैनिक धडधड कोसळू लागले. चार्ल्सच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्या बरोबर व्हिएतनामी सैनिकांच्या डोक्यावरच आदळत होत्या. अचानक झालेल्या या हल्ल्यातून व्हिएतनामी सैनिकांना सावरण्यासाठी वेळच मिळाला नाही. चार्ल्सप्रमाणेच त्याचे आणखी दोन साथीदारही दुसऱ्या ठिकाणाहून त्यांच्यावर निशाणा साधत होतेच. चार्ल्सच्या रायफलमधून सुटणारी एकही गोळी वाया जात नव्हती. २५ ते ७५ मीटर अंतरावरील शत्रूचा चार्ल्सने अत्यंत पद्धतशीरपणे सफाया केला होता. त्या व्हिएतनामी तुकडीला पळूनही जाता आले नाही आणि नदीही पार करता आली नाही.

शत्रू सैनिकांचा वेध घेण्यासोबतच आपल्या सैनिकांची सुरक्षा करणे हेही स्नायपरचे काम असते. व्हिएतनामच्या घनदाट जंगलात कधी कुठून हल्ला होईल हे सांगणे कठीण होते. तेव्हा चार्ल्स त्या जंगलातून फिरून फिरून शत्रूने पेरलेल्या स्नायपरचा शोध घेत. हातात बंदूक असणारी व्यक्ती दिसली की चार्ल्सच्या बंदुकीने त्याचा वेध घेतलाच समजा. चार्ल्सचा हा आक्रमकपणा पाहून अमेरिकन सैन्यालाच घाम फुटत होता. कारण इतक्या आक्रमकतेने कारवाई करणारी व्यक्ति त्यांनी कधी पहिलीच नव्हती.

त्या दिवशी तर चार्ल्सने एक इतिहास घडवला होता. एका सेकंदाला दोन शत्रू मारणे ही काही सोपी कामगिरी नव्हती. चार्ल्सचा हा हिंसकपणा अमेरिकन सैन्यालाच मानवेना तेव्हा त्यांनी चार्ल्सला व्हिएतनाममधून पुन्हा अमेरिकेला परत बोलवून घेतले. चार्ल्स एक वर्षभर तरी व्हिएतनाममधील लष्कर तळावर राहिला असेल. या एक वर्षाच्या काळात त्याने १०३ व्हिएतनामी सैनिकांना मारले होते, तर २१६ सैनिकांना त्याने आपले लक्ष्य बनवले होते.

चार्ल्स व्हिएतनामवरुन अमेरिकेत पोहोचला तेव्हा ३० सेकंदात १६ शीर वेधण्याचा त्याचा पराक्रम सर्वत्र पसरला होता. चार्ल्स हा अमेरिकन नागरिकांसाठी एखादा हिरो बनला होता. निवृत्तीनंतरही चार्ल्सने सैन्याला कायमचा रामराम केला नाही. उलट त्यांनी सैन्यात भरती होणाऱ्या नव्या स्नायपर्सना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेतली. ज्या बंदुकीने चार्ल्सने ही करामत साधली होती ती एम४० रायफल नौदलाच्या वस्तूसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.

चार्ल्सच्या या कामगिरीने स्नायपर विश्वात त्याला एक आदराचे स्थान मिळाले आहे. त्याच्यानंतर एकही स्नायपरला कमी वेळात जास्त लक्ष्य साधण्याच्या या विक्रमाची बरोबरीही करता आलेली नाही. चार्ल्स चकच्या या कामगिरीबद्दल अमेरिकन लष्करात त्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल याबाबत वाद नाही.

चार्ल्सच्या पराक्रमाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.

लेखक: मेघश्री श्रेष्ठी