आपल्याला आग्र्यामध्ये असणाऱ्या ताजमहालबद्दल माहिती असेलच. जगातल्या सात आश्चर्यांमध्ये त्याची गणना केली जाते. पण याच आग्र्यामध्ये एक ताजमहाल नसून दोन ताजमहाल आहेत, हे तुम्हांला माहित आहे का? मुघल सम्राट शहाजहांने आपल्या पत्नीच्या आठवणीमध्ये बांधलेल्या ताजमहालचा इतिहास सर्वानाच माहित आहे. चला तर मग दुसऱ्या ताजमहालचा इतिहास जाणून घेऊयात.
आग्र्यात रोमन कॅथलिक स्मशानभूमी आहे. ही ब्रिटिश पूर्व काळामध्ये युरोपातून भारतात आलेल्या व्यापारी आणि स्थानिक लोकांच्या रियासातींची आठवण करून देणारी उत्तर भारतातील सगळ्यात जुनी ख्रिश्चन स्मशानभूमी आहे. भारताने देऊ केलेल्या उल्लेखनीय धार्मिक स्वातंत्र्यामुळे, नियमित वेतन आणि एकूणच चांगल्या शक्यतांमुळे हे लोक भारतात स्थलांतरित झाले आणि त्यांना भारतात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या खात्यांत नोकऱ्या मिळाल्या. अखेरीस ते स्थानिक संस्कृतीशी इतके जोडले गेले की त्यांनी स्थानिक स्त्रियांशी लग्न केले आणि कपडे, अन्न आणि जीवनशैली यासारख्या त्यांच्या अनेक प्रथा स्वीकारल्या. एवढंच काय, कबर बांधण्याची पद्धत आणि मुघलांचे वास्तुशिल्प सुद्धा युरोपियन लोकांच्या जगण्याचे विलक्षण भाग झाले. याचंच उदाहरण म्हणजे ‘लाल ताजमहाल’.






