सैराट फेम डायरेक्टर नागराज मंजुळेंनी अमिताभ बच्चन सारख्या महानायकाला घेऊन झुंड नावाच्या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे. या सिनेमात आर्ची रिंकू राजगुरू आणि परशा आकाश ठोसर हे ही यात झळकले आहेत. गेले काही दिवस आमीर खान आणि इतर सेलेब्रिटींनी या सिनेमाची केलेली वाहवा सगळीकडे वाचायला मिळतेय. थोडक्यात, मराठमोळी पलटण पुन्हा एकदा बॉलिवूड गाजवतेय. पण यात अजून एक अभिमानास्पद गोष्ट आहे, ती म्हणजे हा सिनेमा ज्यांच्यावर बेतलेला आहे ते विजय बारसे आपल्या नागपूरचे आहेत.
विजय बारसे यांची कहाणी भव्यदिव्य असल्याशिवाय नागराज सारखा डायरेक्टर आणि अमिताभसारखा अभिनेता त्यांच्यावर सिनेमा करायला तयार झाला नसता हे ही तुम्हाला समजले असेल. बारसे यांची कहाणी याआधी देशाने आमिर खानचा शो सत्यमेव जयते मध्ये ऐकली आहे. पण यावेळी सिनेमाच्या रुपात ही प्रेरणादायी गोष्ट जगासमोर येत आहे.
गोष्ट सुरू होते २००० सालाच्या दरम्यान. तेव्हा बारसे हे नागपूर येथील हिसलॉप कॉलेजला क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यासमोर एक छोटीशी घटना घडली. एका बादलीला काही मुलं लाथ मारत होती. तसे बघायला गेले तर ही अतिशय छोटी घटना, पण बारसे यांना या मुलांमध्ये काहीतरी वेगळे दिसले.
त्यांनी विचार केला, या मुलांना जर व्यवस्थित ट्रेनिंग दिले तर ही मुले काहीतरी भरीव काम करून दाखवू शकतील. या मुलांना मग ते खेळाच्या मैदानावर घेऊन आले. मुले मैदानावर आल्यावर त्यांच्यात झालेला बदल म्हणजे ते मन लावून तर खेळायला लागलीच, पण त्यांच्या वाईट सवयीही दूर झाल्या.





