बिहारमधले आयआयटीयन्सचे गाव. पण ते कसे घडले याचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे!!

बिहारमधले आयआयटीयन्सचे गाव. पण ते कसे घडले याचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे!!

परिवारातला किंवा गावातील एक माणूस यशस्वी झाला म्हणजे इतरांना पण मदत करून पुढे घेऊन जातो. महाराष्ट्रात एकाच गावतून अनेक मुले सैन्यात भरती झाली आहेत अशी उदाहरणे आहेत. कारण तेच- एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!! बिहारमधील एक गाव याच पद्धतीने आयआयटीयन्सचे गाव म्हणून ओळखले जात आहे.

गया जिल्ह्यातल्या पटवाटोली या गावात प्रत्येक घरात एक आयआयटीयन सापडतो. या गावाची आता देशात ओळख ही 'व्हिलेज ऑफ आयआयटीयन्स' झाली आहे. कधीकाळी याच गावात चादर, रुमाल, गमछा अशा वस्तू मोठया प्रमाणावर बनत होत्या. पण दारिद्र्य या गावाची पाठ सोडत नव्हते. अनेक दिवस त्यांना विजेशिवायही काढावे लागत असत.

१९९२ साल मात्र टर्निंग पॉईंट समजले जाते. एका शिलाई कामगाराचा मुलगा जितेंद्र सिंग याने आयआयटीत ऍडमिशन मिळवले. पठ्ठया सर्वांचा रोल मॉडेल झाला. तो मात्र थांबला नाही, त्याने गावाला यातून एक दिशा दिली. तेव्हापासून इथल्या मुलांचे आयआयटीमध्ये ऍडमिशन होण्यास सुरुवात झाली.

या गावात तयार झालेली सिस्टीम गावाची विशेषता आहे. यामुळे कुठल्याही मोठ्या कोचिंग शिवाय या गावातली मुले आयआयटीत भरती होत आहेत. इथे एक लायब्ररी आहे जी गावतील युवक पैसे जमवून चालवतात. त्यांच्या आयआयटी सिलेक्शनचे केंद्र ही लायब्ररी आहे. या लायब्ररीमध्ये आधी सिलेक्ट झालेली मुले नविन परीक्षा देत असलेल्या मुलांना मोफत शिकवतात.

आता तुम्ही विचार करा, मोठ्या क्लासेसची जाहिरात असते- "आयआयटीयनकडून आमच्या कोचिंग क्लासमध्ये शिकून घ्या!"! पण यासाठी त्यांना तगडी फी द्यावी लागते. इथे सगळेच शिकवणारे सिनियर गावातील आयआयटीयन मित्र असल्यावर मुलांचा हुरूप किती असेल. ऑफलाइन-ऑनलाइन अशा दोन्ही पध्दतीने या मुलांना कोचिंग दिली जात असते.

दरवर्षी १०-१२ विद्यार्थी या गावातून आयआयटीमध्ये असतात. आजवरची एकूण संख्या ३०० पेक्षा अधिक आहे. याचाच अर्थ भारतातील एकाच गावातील ३०० मुले आज जगाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या कंपन्यांमध्ये कर्तृत्व गाजवत आहेत. एकीचे बळ काय असते हेच यातून सिद्ध होते.

फालतू गोष्टींमध्ये अडकून न पडता करियरलाच सर्वस्व माणूस झोकून देऊन मेहनत करण्याची तयारी आणि यशस्वी झालेल्या मुलांनी गाबाबद्दल कृतज्ञता म्हणून केलेली मेहनत यामुळे हे गाव आज वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहे.

उदय पाटील