Mr. India म्हणलं की सगळ्यांना एक अदृश्य माणूस आठवतो. सिनेमात दाखवल्याप्रमाणे तो अस्तित्वात असतो, पण प्रत्यक्षात दिसत नाही. असंच एक अदृश्य घर लंडनमध्ये आहे. जिथे एक कुटुंबही राहाते. लंडनच्या रिचमंडमध्ये असलेल्या या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अदृश्य घराचे फोटो कसे असतील? हीच तर गंमत आहे. आज ते अदृश्य घर कसे उभारले आहे याची माहिती घेऊयात.
लंडनचे इनव्हिजिबल होम म्हणजे अदृश्य घर म्हणून ते प्रसिद्ध झाले आहे. इथून येणाऱ्या जाणाऱ्या अनेक जणांना हे घर आहे, हे इतके दिवस लक्षात आले नाही असे त्यांनी सांगितले. या घराच्या बाहेरच्या बाजूने एक मोठा आरसा किंवा काचेचे पॅनल लावले आहे जेणेकरून बाहेरच्यांना आत काय आहे हे दिसत नाही. बाहेरून पाहिल्यास त्यांना स्वतःची छबी दिसते. रस्त्यावर येणारी जाणारी वाहने, झाडे, आकाश दिसते. पण प्रत्यक्षात ते घर आहे आणि तिथे लोकही राहतात.
एका यूझरने या घराचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला चालताना रस्त्यात मोठा आरसा दिसला. त्याने स्वतःला त्यात पाहिले. त्याने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला जाणवले की हे प्रत्यक्षात घर आहे. सोशल मीडियावर हा फोटो पाहिल्यावर दुसऱ्या युझरने लिहिले की, तो या वाटेने अनेकवेळा गेला आहे पण त्याच्या लक्षात आले नाही.
त्या घरात जे कुटुंब राहते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न झाल्यावर त्यांनी गोपनीयता राखण्याची विनंती केली. कुटुंबाने सांगितले की हे घर आर्किटेक्ट आणि कलाकार ॲलेक्स हॉ यांनी २०१५ मध्ये डिझाइन केले होते. हे कुटुंब २०१९ पासून या अनोख्या घरात राहत आहे. विशेष म्हणजे घराचा मागचा भाग कोणत्याही सामान्य घरासारखा दिसतो. आणि घरात राहणार्या लोकांनी असेही सांगितले की त्यांना बाहेरून येणारे लोक आणि त्यांच्या हालचाली स्पष्टपणे पाहता येतात.
आर्किटेक्टने कसला विचार करून हे घर असे बांधण्याचा विचार केला असेल कोणास ठाऊक? तुम्हाला हे फोटो पाहिल्यावर काय वाटते?
शीतल दरंदळे
