सध्या कुठून कोणता व्हिडीओ येईल आणि वायरल होईल याचा भरवसा नाही. मग माणूस रात्रीत सेलेब्रिटी होतो. अशाप्रकारे फेमस होण्याचा सहसा प्रत्येकाला फायदाच होतो. आता नुकताच सोशल मीडियावर ज्या पठाणी मुलाचा विडिओ वायरल झाला होता त्याला तर सिरीयलमध्ये पण काम मिळाले. प्रिया प्रकाशचा विडिओ वायरल झाल्यावर एका रात्रीत तीचे फॉलोअर्स ६० लाखांवर पोहोचले, ते गोविंदाच्या गाण्यावर डान्स करणारे काका तर तुफान व्हायरल झाले होते. एवढेच काय मंडळी, आयपीएल दरम्यान आरसीबीचा टी-शर्ट घातलेली मुलगी फक्त एका सेकंदासाठी कॅमेऱ्यासमोर आली तरी तिचे फॉलोअर्स काही लाखांवर गेले. तर अशी ही सोशल मीडियामधून प्रसिद्ध होण्याची पद्धत आहे मंडळी !!
सेलिब्रिटी खेळणीवाला...व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याला पोलिसांनी का पकडलं ??


कदाचित उद्या तुमच्या आजूबाजूचा कुणी फेमस झाला तर आश्चर्य वाटायला नको. ते सोडा, उद्या तुमचा काही आगाऊ धंदे करतानाचा एखादा विडिओही वायरल होऊ शकतो भाऊ.. मग तर तुम्ही पण फेमस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सांगतो, तयारीत रहा गड्यांनो!! पण या फेमस होण्याचा दरवेळी फायदा होतो असे नाही. बऱ्याच वेळा असे वायरल होणे आपल्याला महागात पडू शकते. याचे उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी फेमस झालेला रेल्वे बॉय!!
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका विडिओने धुमाकूळ घातला होता. तब्बल २० लाख लोकांनी पाहिलेला आणि ३० हजार लोकांकडून हा व्हिडिओ शेयर केला गेला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो विडिओ पाहिला असेल. रेल्वेत एक माणूस खेळणी विकत असताना मोदी-केजरीवाल-सोनियाका बेटा असे बोलतोय आणि रेल्वेतली लोकं कुतुहलाने त्याची स्टँड अप कॉमेडी ऐकत आहेत असा तो व्हिडिओ होता. मंडळी, एकदा स्वतः विडिओ बघाच. कारण या माणसाची स्टाईल एकदम हटके आहे. जर तो ट्रेनमध्ये गुजराती लोकांना "चला, आणखी एक फसला", " खेळणं बिघडलं तर मला फोन करा, कुठे फेकून द्यायचे ते मी सांगतो" असं म्हणून जर तो १००रुपयांची गोष्ट विकू शकत असेल तर सोशल मीडियावर तर हा माणूस जगात कुठेही कुठलीही गोष्ट विकू शकतो.

या गड्याचे नाव आहे अवधेश दुबे!! उत्तर प्रदेशातला अवधेश गुजरातमध्ये रेल्वेत खेळणी विकतो. हा भाऊ रेल्वेत खेळणी विकत असताना नेहमीच एकाहून एक खतरनाक डायलॉग बोलून आपला धंदा करत असतो. त्याची पद्धत आवडल्याने अनेक लोक त्याच्याकडून खेळणी विकत घेतात. सगळे सुरळीत चालू असताना एका प्रवाशाने त्याची डायलॉगबाजी शूट केली आणि सोशल मीडियावर टाकली. मग काय, याची हटके स्टाईल पाहून त्याला फेमस व्हायला वेळ लागला नाही. हा भाऊ त्याची खेळणी विकताना नेत्यांवर विनोद करायचा. मंडळी, आपल्या देशात सध्या राजकारणावर कॉमेडी करणाऱ्यांचे अच्छे दिन आले आहेत. तसाच हा भाऊ रेल्वेत नेत्यांवर कॉमेडी करून आपले पोट भरत होता. राहुल गांधी, केजरीवाल, मोदी यांच्यासारख्या नेत्यांवरील त्याच्या डायलॉग्समुळे त्याचा विडिओ रातोरात वायरल झाला.

भाऊ आता सेलेब्रिटी झाला होता. ज्या स्टेशनवर खेळणी विकायचा त्याच स्टेशनवर लोक आता त्याच्या सोबत सेल्फी घेऊ लागले. त्याची खेळणी पण आधीपेक्षा जोरात विकली जाऊ लागली. एके दिवशी असेच स्टेशनवर खेळणी विकत असताना रेल्वे पोलीस आले आणि त्याला घेऊन गेले. आता हा भाऊ जेलची हवा खाऊन परत आलाय. तुम्ही म्हणाल असे कसे झाले? नेत्यांवर विनोद केले म्हणून जेलमध्ये टाकले असे पण बऱ्याच जणांना वाटत आहे. पण तसे नाही मंडळी!! रेल्वेमध्ये काहीही विकायचे असेल तर तुमच्याकडे लायसन्स असावे लागते. अवधेशकडे लायसन्स नसल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. दंड भरून आणि लवकरच लायसन्स काढेल या अटीवर त्याची सुटका करण्यात आली आहे.
रेल्वेत बरीच लोक विना लायसन्स सामान विकत असतात. पण अवधेश फेमस झाल्याने तो अधिकाऱ्यांच्या नजरेत आला. आता तो लोकांना हात जोडून विनंती करत आहे, 'मला माझे काम करू द्या'. फेमस झालो नसतो तर मला जेलची हवा खायला लागली नसती.

मंडळी, फेसम होणे पण कसे महाग पडू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. सध्या सगळ्यांना फेसम व्हायचे आहे. मग फेमस होण्याच्या नादात नको त्या गोष्टी लोक करुन जातात आणि नंतर त्रास होतो. इथे तर या बिचाऱ्याने तसा फेमस व्हायचा प्रयत्न पण केला नव्हता, तरी त्याला त्रास सहन करावा लागला. सोशल मीडियाचा वापर जेवढा चांगल्या कामासाठी केला तेवढा त्याचा जास्त फायदा आहे.
तुम्हांला अवधेशच्या कॉमेडीबद्दल काय वाटतं आम्हालाही सांगा...