व्हायरल व्हिडीओ: बाली मधे या भारतीय कुटुंबाला चक्क हॉटेल मधुन सामान चोरताना पकडलं

लिस्टिकल
व्हायरल व्हिडीओ: बाली मधे या भारतीय कुटुंबाला चक्क हॉटेल मधुन सामान चोरताना पकडलं

मागे एक मेसेज फिरत होता की आपल्याला कशी मेट्रो हवी आहे, पण आपण तिथले चांगले सामान घरी घेऊन जातो. आपल्याला चांगली हॉटेल्स हवी आहेत पण आपण तिथले चमचेसुद्धा घरी घेऊन जातो. मध्यंतरी सरकारने तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. चाळू झाल्याच्या अगदी काही दिवसांनी लोकांनी तिच्या काचा फोडल्या, सीट्स फाडल्या, स्क्रीन्स चोरल्या किंवा तोडल्या..  काही लोकांना असे प्रकार करण्यात आसुरी आनंद होतो! मग जर असे असेल तर सरकारने कितीही चांगली योजना आणली तरी काय फायदा राव!! 

एकंदरीत या सर्व गोष्टी पाहता भारतीय लोक चांगल्या गोष्टींसाठी अजून तयार नाहीत असा त्या मेसेजचा सारांश होता. त्यावर बऱ्याच लोकांनी आपण कसे चांगले आहोत, कसे दुसऱ्यांना मदत करतो याचे काही दाखले द्यायला सुरुवात केली. पण मंडळी, आता एका घटनेने तो संदेश किती खरा होता हे सिद्ध झाले आहे. या एका घटनेने जगभरात भारताची मान शरमेने खाली गेली आहे राव!! भारतीयांनी या घटनेचा निषेध केलाय आणि पाकिस्तानी पब्लिक तर आधीच उड्या मारायला लागली आहे. 


 

तर मंडळी, इंडोनेशिया देशातल्या बाली इथं काही भारतीय एका हॉटेलातून सामान चोरी करताना पकडले गेले.  त्यांचा व्हिडिओ जगभर वायरल झाला आहे. या व्हिडिओत त्या हॉटेलचा स्टाफ एका भारतीय कुटुंबाचे सामान चेक करत आहे, आणि तो एकेक करून हॉटेलमधून चोरलेल्या  बऱ्याच गोष्टी बाहेर काढत आहे.  पकडले गेल्यावर आपले भारतीय गडी त्याला "जास्त पैसे घेऊन घे पण प्रकरण मिटव, आमची फ्लाईट आहे आम्हांला जाऊ दे" असे त्याला सांगत आहेत. कदाचित  भारतातल्यासारखे चिरीमिरी देऊन प्रकरण मिटते तसे तिथे पण मिटेल अशी आशा त्यांना वाटली असेल. व्हिडीओच्या सुरवातीला हॉटेलचा स्टाफ," आता तुम्ही सॉरी म्हणत आहात, पण काही वेळापूर्वी तुम्ही आमच्यावर ओरडत होता" असं म्हणताना दिसतो. म्हणजे उलटा चोर कोतवालको डाँटे असंच झालं की राव!!

मंडळी, जेव्हा आपले भारतीय गडी त्यांना लाच देऊ पाहात  होते तेव्हा ते बालीतले लोक म्हणाले की, "इथे विषय पैशांचा नाही, विषय सन्मानाचा, आदराचा आहे." आम्ही तुम्हाला एवढा सन्मान दिला, पण तुम्ही चोरी केली याचा अर्थ एवढे सगळे करून पण तुमच्या मनात अमच्याविषयी जराही सहानुभूती नाही असाच याचा अर्थ होतो.

आपले गडी एवढे हुशार की एक बाई त्यांना सांगत होती की हे सामान आमच्यासोबत असलेल्या लहान मुलाने चोरले आहे. एक भाऊ तर तिथल्या एका स्टाफला कोपऱ्यात घेऊन जाऊन काहीतरी सांगताना दिसतो. एवढे सगळे करून पण हॉटेलचा स्टाफ काय बधला नाही राव!! 

काय काय सामान चोरले?

 

 

 

हॉटेलातला आरसा, हेयरड्रायर, बास्केट, हँगर्स, हँड वॉशचा डिस्पेन्सर, शोभेच्या वस्तू असल्या गोष्टी चोरून त्या टॉवेल आणि कशाकशात गुंडाळून या लोकांनी सामानात पॅक केल्या होत्या. परदेशात फिरायला जाऊ शकणाऱ्या लोकांकडे घरी एवढ्या क्षुल्लक गोष्टी पण नसतील का राव!! 

परदेशात लोक भारतीयांच्या अशा सवयी सांगून आपल्याला जाम ट्रोल करायला लागले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे भारतीय नेटकरी पण जाम संतापले आहेत. या एका घटनेने पाकिस्तानसारखे देश सुद्धा भारताची लाज काढत असल्याने राग येणे साहजिक आहे राव!! मंडळी, काही दिवसांपूर्वी परदेशी पर्यटकांना भारतात मारहाण झाल्याची घटना घडली होती. ते जेव्हा परत त्यांच्या देशात गेले असतील तेव्हा भारताबद्दल त्यांच्याकडे काय आठवणी  असतील राव?... आपण साधू संतांची, विचारांची, अतिथी देवो भवची संस्कृती सांगतो आणि अशा शरमेने मान खाली जावी अशा घटना नेहमी घडतात राव!! यावर विचार करणे गरजेचे आहे.