गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दुष्काळाचे चित्र असताना महाराष्ट्रभर वरूणराजाचे जोरदार आक्रमण झाले आहे. मुंबईत आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या जोरदार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांत पाणी साचले आहे. अनेक लोक घरातच अडकून पडले आहेत, तर अनेकांना नाईलाजाने कामावर जावे लागले आहे. एकंदरीत मुंबई विस्कळीत झाली आहे राव!!
मुंबईत काही ठिकाणी रस्त्यांचा स्विमिंगपूल झालाय. वाहतुकीवरही याचा परिणाम दिसून येतोय. पावसामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ७ विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. मंडळी, या सर्व गोष्टींवरून मुंबईत परिस्थिती कठीण झाली आहे हे तुम्हाला समजले असेलच. मुंबईकर या सगळ्या परिस्थितीला नेहमीप्रमाणे नेटाने सामोरे जात आहेत.

