बादली म्हणजे आपल्या रोजच्या भाषेत बालटी चोरीला जाणे हा अनुभव आता इतिहासजमा झाला आहे. एकेकाळी चाळकर्यांच्या बादल्याच काय, टमरेलं पण चोरीला जायची. चाळीत त्यावरून मोठ्ठी भांडणं वगैरे व्हायची आणि संपायची. पण एक बादली चोरीला गेल्यामुळे एक युध्द झालं आणि २००० सैनिक मृत्युमुखी पडले असाही एक इतिहास आहे. चला तर आज वाचूया या चोरीला गेलेल्या बादलीच्या युध्दाची कथा!
हे अनोखे युद्ध होऊन आता तशी ८०० वर्षं होऊन गेली आहेत. पण आजही हे युद्ध त्याच्या आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. तो काळ असा होता जेव्हा इटलीमध्ये धार्मिक तणाव शिगेला पोहोचला होता. त्याठिकाणी दोन राज्यं होती, एक म्हणजे बॉलोग्ना आणि दुसरे मोडेना. बॉलोग्नाला समर्थन होते ख्रिस्त धर्मगुरू पोप यांचे, तर मोडेनाला समर्थन होते रोमन सम्राटाचे. बॉलोग्नाच्या लोकांसाठी पोप श्रेष्ठ होते आणि मोडेनाकरांसाठी रोमन सम्राट श्रेष्ठ होता.



