स्त्री ही प्रसंगी पराक्रमी बनली तरी तिच्यात ममता वसते, ती कारुण्याची मूर्ती असते असे मानले जाते. आजची राणी मात्र या संकल्पनेला छेद देणारी आहे. अर्थात तसे तसे बनण्यासाठी तिची स्वत:ची तशी कारणे असतील. पराक्रमी तर ती होतीच, पण निर्दयीपणातही तिने सर्व मर्यादा पार केल्या होत्या. चला तर वाचूया या राणी बौडीकाबद्दल!!
एकेकाळी ब्रिटिश साम्राज्यावर सूर्यास्त होत नसे असे म्हटले जाई. पण इंग्लंडवरही कधी काळी रोमन साम्राज्याची सत्ता होती. ही गोष्ट आहे इसवीसन पूर्व ४३ ची. रोमन सैनिकांनी दक्षिण इंग्लंड आपल्या ताब्यात घेतला होता. पण या प्रदेशात असलेल्या राजांच्याच हाती त्यांनी जिंकलेल्या प्रदेशाची सूत्रे सोपवली. दक्षिण इंग्लंडमध्ये त्याकाळी राजा प्रेसॅटॅगस या आयसेनी जमातीच्या राजाचे राज्य होते. हा प्रदेश रोमन सैन्याने जिंकला असला तरी राजा प्रेसॅटॅगस हाच तिथला प्रशासकीय प्रमुख राहणार होता.
राजा प्रेसॅटॅगस आणि राणी बौडीका यांना दोन मुली होत्या. राजाच्या पश्चात राज्याचे संरक्षण करण्यासाठी त्याला वारस नव्हता. पण राजा प्रेसॅटॅगसने आपल्या पश्चात राणी बौडीकाकडे राज्याची सूत्रे दिली जावीत अशी तरतूद करून ठेवली. प्रत्यक्षात जेव्हा इसवीसन पूर्व ६० मध्ये राजा प्रेसॅटॅगसचा मृत्यू झाला तेव्हा रोमन साम्राज्याने राजाच्या मृत्युपत्राचा मान न राखता त्याचे राज्य बळकावले. हे राज्य आपल्या ताब्यात घेतले. रोमन सैन्याने आयसेनी जनतेवर प्रचंड अत्याचार केले, त्यांना मारहाण केली, त्यांची संपत्ती जाळून टाकली, राणी बौडीका आणि तिच्या मुलींवरही अनन्वित अत्याचार केले.


