अंडर-१९ संघातील टॉप ५ खेळाडू , एकापेक्षा एक सरस !

लिस्टिकल
अंडर-१९ संघातील टॉप ५ खेळाडू , एकापेक्षा एक सरस !

भारतीय क्रिकेटमधील युवा ब्रिगेडने इतिहास रचला आहे. टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वविजेती झाली आहे. वेस्टइंडिज येथे आयोजित करण्यात आलेला अंडर १९ वर्ल्डकप जिंकून विक्रम करत पाचव्यांदा या ट्रॉफीवर भारताचे नाव कोरले आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या फायनलमध्ये भारतासमोर १९० रन्सचे आव्हान होते. भारताचा धडाकेबाज खेळाडू दिनेश बाना याने ४७ व्या ओव्हरमध्ये सिक्स मारत भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
अंडर १९ संघ म्हणजे राष्ट्रीय संघातील भावी चेहरे समजले जातात. विराट कोहली, पृथ्वी शॉ सारखे खेळाडू अंडर १९ संघातून पुढे आले आहेत. आता देखील काही खेळाडूंनी आपल्या तुफान खेळाने देशवासीयांच्या अपेक्षा जागृत केल्या आहेत. यातील भविष्यातील भारतीय संघाचा चेहरा बनण्याची क्षमता असलेल्या काही खेळाडूंची यानिमित्ताने ओळख करून घेऊया.

१) यश धुल

१) यश धुल

कोरोना झाल्याने या भारतीय कॅप्टनला सुरुवातीचे काही सामने खेळता आले नाहीत. पण आपल्या बॅटिंगच्या करिष्म्याने त्याने उर्वरित सामन्यात भारताला सुरक्षित परिस्थितीत आणून ठेवले होते. कमी सामने खेळूनही तो भारतासाठी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या महत्वाच्या सेमी फायनलमध्ये त्याने शतक काढत भारताला विजय मिळवून दिला होता.

यशने ३ सामन्यांमध्ये २१२ रन्स काढत, स्वतःची मजबुती सिद्ध केली आहे. कॅप्टन असल्याबरोबर त्याने रन्स काढण्यात जे सातत्य दाखवले त्यामुळे हा भाऊ भविष्यात आणखी करिश्मा दाखवणार हे कळून आले आहे.

२) अंगरिश रघुवंशी

२) अंगरिश रघुवंशी

अंगरिश या स्पर्धेतील भारताची रणमशिन म्हणून पुढे आला असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ५ सामन्यांमध्ये त्याने ५५ च्या सरासरीने २७८ रन्स कुटले. ओपनिंगला खेळायला येणारा हा पठ्ठ्या स्पर्धेत सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. बॉलिंगमध्येही चमक दाखवत त्याने २ विकेट स्वतःच्या नावे केल्या आहेत.

३) राज बावा

३) राज बावा

थरारक बॅटिंगचा नमुना जर का या स्पर्धेत दिसला असेल तर तो राज बावा या खेळाडूच्या १०८ बॉल्सवर १६२ धावा केल्यानंतर दिसला होता. युगांडाविरुद्ध झालेल्या सामन्यात या भावाने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता. स्पर्धेत ११० च्या तुफान स्ट्राईक रेटने त्याने २१७ रन्स केले आहेत.

४) विकी ओस्वाल

४) विकी ओस्वाल

भारतासाठी फिरकी बॉलिंग करणारा विकी पूर्ण स्पर्धेत आपल्या फिरकीवर समोरच्या खेळाडूंना नाचवताना दिसला. ५ सामन्यांमध्ये १२ विकेट घेत त्याने सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये ७ क्रमांक मिळवला. विकेट घेण्याबरोबरच त्याची मोठी कामगिरी म्हणजे त्याच्या बॉलिंगवर तो बॅटिंगला आलेल्या खेळाडूला खुलून खेळण्याची संधीच देत नसे. याचमुळे त्याने अवघ्या ३.८९ च्या इकॉनॉमी रेटने बॉलिंग केली.

५) राजवर्धन हंगार्गेकर

५) राजवर्धन हंगार्गेकर

आपल्या तुळजापूरचा असलेला राजवर्धन आता पूर्ण देशाचा हिरो बनू पाहत आहे. सेमीफायनलमध्ये तब्बल १४१.७ च्या स्पीडने बॉलिंग करत त्याने आपण फास्ट बॉलिंगचा बादशाह बनण्यासाठी तयार आहोत हे दाखवून दिले आहे. राजवर्धनकडे भारतीय बॉलिंगचे भविष्य म्हणून बघितले जात आहे.

राजवर्धन आधी फिरकी बॉलिंग करत असे. नंतर तो फास्ट बॉलिंगकडे वळला आणि हा निर्णय किती योग्य होता हे त्यानेच सिद्ध करून दाखवले आहे. या स्पर्धेत त्याने ३.३५ च्या इकॉनॉमी रेटने ५ विकेट घेतल्या आहेत.

उदय पाटील

टॅग्स:

cricket

संबंधित लेख