भटक्या जमाती आणि स्थिरस्थावर आयुष्य जगणारे प्रगतशील नागरिक या दोन घटकांमध्ये पूर्वापार काळापासून मतभेद चालत आलेले आहेत. आपापले प्रदेश सुरक्षित आणि अबाधित ठेवण्यासाठी या दोन घटकांमध्ये युद्धही होत असत. अमेरिकेतली अपाचे नावाची एक भटकी जमात आणि अमेरिकन नागरिक यांच्यातही वारंवार अशाप्रकारची युद्धे होत असत. चीरीकावा अपाचे नावाची एक अशीच लढवय्यी जमात आहे. ही जमात अमेरिका आणि मेक्सिको परिसरातील सर्वात जुनी स्थानिक जमात होती असे समजले जाते. या अपाचे लोकांत आणि अमेरिकन यांच्यात वारंवार लढाया होत असत.
अपाचे जमातीचे लोक भटके असल्याने त्यांना युद्ध कला शिकणे आणि लढाई करणे भागच होते. इतर ठिकाणच्या संस्कृतीप्रमाणे इथेही पुरुष युद्ध, गुरे राखणे, भटकंती करण्यात वेळ घालवत तर या जमातीतील स्त्रिया मुलांचे पालनपोषण आणि घराची देखरेख करत असत.
अशा या रानटी जमातीत १९ व्या शतकात लोझेन नावाच्या एका लढवय्यी, कणखर आणि अलौकिक शक्तींनी युक्त अशा मुलीचा जन्म झाला. लोझेन लहानपणापासूनच घरकाम आणि स्त्रियांची इतर परंपरागत कामे शिकण्यापेक्षा युद्धकला शिकणे, घरातील मोठ्या पुरुषांसोबत भटकंतीवर जाणे आणि घोडेस्वारी करणे, शत्रूचे पशुधन चोरणे यातच जास्त रस घेत असे. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत लोझेन इतकी पारंगत झाली की तिला तिचा भाऊ व्हिक्टोरिओला त्याच्या कामात मदत करू लागली. लोझेनला शत्रूच्या पुढील हालचालींचा अंदाज येत असे तिच्या या आंतरदृष्टीचा फायदा घेत तिच्या सल्ल्यानुसारच अपाचे लोक आपली रणनीती आखत असत. याशिवाय लोझेनकडे वैद्यकीय ज्ञानही होते त्यामुळे तिच्या समुदायात तिला फारच मानसन्मान मिळत असे.


