नोकरी सोडून सव्वा लाख किमींचा प्रवास करत १४४ शहिदांच्या घरातली माती गोळा करणारा देशप्रेमी: उमेश जाधव!!

नोकरी सोडून सव्वा लाख किमींचा प्रवास करत १४४ शहिदांच्या घरातली माती गोळा करणारा देशप्रेमी: उमेश जाधव!!

भारतीय लष्कराबद्दल देशातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रचंड आदर आहे. आपला देश असा आहे की जेव्हा एक भाऊ सीमेवर शहीद होतो, तेव्हा दुसरा भाऊ सैन्यात जायची तयारी सुरू करतो. देशवासियांमध्ये देशप्रेम ओतप्रोत भरले आहे. सैनिकांबद्दल असलेल्या प्रेमापोटी प्रत्येकजण काहीतरी करू इच्छित असतो.

बंगळुरू येथील उमेश गोपीनाथ जाधव यांना पण सैन्याबद्दल प्रेम होते. या प्रेमातून त्यांनी जो त्याग केला आणि या त्यागातून त्यांनी जे काही साध्य केले ते या दोन्ही गोष्टी उमेश जाधव यांच्याबद्दल आपल्या मनात मोठा आदर निर्माण करतील.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय वीर शहीद झाले. या घटनेने देशातील प्रत्येक व्यक्ती हादरून गेला होता. भारतीय सैन्याने या हल्ल्याचा बदला घेतला. देशभरात विविध माध्यमांतून लोकांनी या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

उमेश जाधव यांनी पण आगळीवेगळी श्रद्धांजली शहिदांना द्यायचे ठरवले. ते फार्मसीचे प्राध्यापक आणि संगीतकार होते. त्यांनी आपली नोकरी सोडून दिली आणि ३ वर्षं एका प्रवासासाठी निघाले. देशभरातील शहिदांच्या घरातील माती गोळा करण्याचा हा त्यांचा प्रवास होता.

गेली ३ वर्ष फिरून त्यांनी १४४ शहिदांच्या घरातील माती गोळा केली आहे. या भ्रमंतीसाठी त्यांनी एक कार घेतली आणि या कारवर देशभक्तीपर वाक्य लिहिले. हॉटेलमध्ये थांबण्यासाठी पैसे नव्हते म्हणून याच कारमध्ये त्यांचा मुक्काम ठरलेला असे. जाधव यांनी या मोहिमेत फक्त पुलवामा शहिदांच्या घरातील माती गोळा केली असे झाले नाही. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, कारगिल, पठाणकोट हल्ला, उरी हल्ला या हल्ल्यांतील शहिदांच्या घरी पण जाऊन आले. एच गुरू या शहिदांच्या घरापासून त्यांनी हा प्रवास सुरु केला.

पुढे जाऊन ते फिल्ड मार्शल एच. करिअप्पा, जनरल सॅम मानेकशॉ, मेजर संदीप उन्नीकृष्णन या महान अधिकाऱ्यांच्या घरी पण जाऊन आले. जाधव सांगतात की त्यांनी जी माती गोळा केली आहे ती डिफेन्स फोर्सेसना दिली जाईल आणि दिल्लीत एक मेमोरियल तयार होणार आहे.

जाधव या सर्व प्रवासाबद्दल बोलताना सांगतात की, "सैनिकी युनिफॉर्म घातल्याशिवायही देशासाठी बरेच काही करता येऊ शकते. देशभर फिरल्यावर आणि शहीद कुटुंबांसोबत बोलून मला हाच अनुभव आला आहे."

जाधव यांनी केलेल्या या प्रवासाबद्दल आणि त्यांनी जमा केलेल्या शहिदांच्या घरातील मातीसाठी त्यांचे कौतुक करण्यापेक्षा त्यांचे आभार मानले पाहिजे.

उदय पाटील