चित्रविचित्र लोक - भाग १ : गेली ४० वर्षांहून अधिक काळ हात हवेत ठेवणारे साधुबाबा !!

चित्रविचित्र लोक - भाग १ : गेली ४० वर्षांहून अधिक काळ हात हवेत ठेवणारे साधुबाबा !!

मंडळी, जग चित्रचिचित्र नमुन्यांनी भरलंय. आम्ही घेऊन येणार आहोत अशाच काही चित्रविचित्र लोकांची मालिका.  काहींनी हा विचित्रपणा स्वत:ला लावून घेतलाय तर काही लोकांचं यावर नियंत्रणच नाहीय. तेव्हा ही मालिका करताना म्हटलं, "जगात कशाला?, इथं आपल्या देशात अशा लोकांची कुठे कमतरता आहे?". म्हणून सुरवात करत आहोत, एका उदात्त ध्येयानं पछाडलेल्या भारतीय मनुष्याच्या गोष्टीपासून. 

हे आहेत साधू  अमर भारती. त्यांनी  आजकाल नाही, तर १९७३मध्ये त्यांचा हात उंचावलाय, तो अजून खाली केलाच नाहीय. आता या घटनेला जवळजवळ ४४ वर्षं लोटलीत. इतक्या वर्षांत तो हात न हलवल्यानं त्या हाताच्या मज्जासंस्थेनं काम करणं बंद केलंय, तिथली हाडं, स्नायू आणि कातडीचीही हानी झालीय, आणि त्यांची नखं गोलगोल वळत विचित्रपणे वाढली आहेत. 
का बरं त्यांनी असं केलंय? वाचा पुढे त्यांची कहाणी.. 

हे साधू म्हणे पूर्वी दिल्लीत क्लार्कचं काम करायचे. साधारणपणे १९७०च्या आसपास त्यांनी त्यांच्या नेहमीच्या जीवनपद्धतीचा त्याग केला आणि शंकराच्या भक्तीत त्यांनी जीवन व्यतीत करायचं ठरवलं. त्यानंतर तीनच वर्षांनी त्यांनी जगासाठी शांतीचं वरदान मागत आकाशाच्या म्हणजेच स्वर्गाच्या दिशेने उजवा हात उंचावला आणि तो आजतागायत त्याच स्थितीत आहे. 

वैद्यकीय शास्त्राच्या मते असं केल्यानं शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो, स्नायू काम करणं बंद करतात आणि शरीराच्या त्वचेचीही यामुळं हानी होते. आपलंच उदाहरण घ्या ना. जर हात कधी प्लास्टरमध्ये दोन-चार आठवड्यांसाठी घातला किंवा काही कारणानं एखादा अवयव अवघडला असेल, तर डॉक्टर आपल्याला शरीराचा तो भाग सहन होईल तितका हलवत राहायला सांगतात. तेव्हाही हालचाल करताना अंग दुखतं, पण ते स्नायू अगदीच कामातून जात नाहीत. 

अमर भारतींनी काही पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, "पहले दर्द होता था, अब आदत हो गई है". हात उंचावला तेव्हा आधी तो खूप दुखत असे. पण त्यांनी त्या वेदनेवर मात केली. मग हाताला मुंग्या येणं, त्या मुंग्यांच्या वेदना असह्य होणं हे सगळं होत गेलं. नंतर तर तिथल्या संवेदना नष्ट होतानाही त्यांना जाणवत होत्या.. आणि  हे सारं साधू अमर भारती पाहात राहिले. काही काळानंतर वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्या आणि आता तो हात तसाच उंचावलेला राहिलाय. 

या प्रकारात साधू अमर भारती एकटेच नाही आहेत. त्यांच्या काही अनुयायांनीही त्यांच्या कार्यासाठी  हात उंचावलाय. काहींनी हात उंचावून १०  ते २५ वर्षांहून अधिक काळ लोटलाय आणि त्यांचेही हात साधूबुवांसारखेच निकामी झाले आहेत. आपल्याकडे पूर्वी नवस करताना 'हात गहाण' ठेवायची पध्दत होती, म्हणजेच नवस पूर्ण करण्यासाठी शरीराचा तो अवयव कधीही न वापरणं. हा प्रकार थोडा तसाच असला, तरी त्यात शरीराच्या गैरसोयीसोबतच खूप वेदनाही सहन कराव्या लागत आहेत. 
 
काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे मात्र हा हात शांतीसाठी नाही, तर शिवशंकराच्या आराधनेसाठी वरती उंचावलाय. काही असो, मनात घेतलेल्या कामावर निष्ठा असेल, तर माणूस कोणत्याही वेदनांवर मात करून त्या कामाचा पाठपुरावा करू शकतो हे साधू अमर भारतींनी सिद्ध केलंय. त्यांना बोभाटा चा कडक सलाम!!