दिवस गेले जेव्हा सोन्यावर कर्ज घेण्यासाठी पण मामाला तारण ठेवायला लागायचं! आता कर्ज घेणं फारच सोपं झालंय! दिवसाला दहा कंपन्या 'आमच्याकडूनच कर्ज घ्या' असा जोगवा मागत असतात!
पण ही फक्त सुरुवात असते.आधी फॉर्म भरा, आयटीआरच्या कॉप्या जोडा, चार फोटो, केवायसी द्या,कॅन्सल्ड् चेक द्या, पुढच्या हप्त्याचे पीडीसी द्या -एक नाही हजार चौकशांना तोंड देता देता कर्ज घेण्याची इच्छाच मरायला टेकते. पण म्हणतात ना, 'मरता क्या न करता' अशी परिस्थिती असली तर हे सगळं करावंच लागतं. थोडक्यात, आधी फक्त दोरीवरच्या उड्या मारण्याची कसरत प्रत्यक्षात १००० मीटरची अडथळ्याची शर्यत वाटायला लागते.
पण आता एक गुड न्यूज वाचा! रिझर्व बँकेने हे सगळेच पैशाचे व्यवहार सोपे करण्यासाठी 'अकाउंट अॅग्रीगेटर' ही संकल्पना अमलात आणली आहे. हे समजून घेण्याचे दोन मार्ग आहेत. त्यापैकी अगदी राजमार्ग म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मूळ सर्क्युलर वाचणे. अडचण अशी आहे की त्यात clause (iv) of sub-section 1 of section 3.... अशा खंग्री भाषेत शंभर दोनशे उल्लेख आहेत. ते सहन करता येत असेल तरच वाचा! आम्हाला ते वाचायला ७२ तास लागले तुमचं तुम्ही बघा बॉ! दुसरा सोप्पा मार्ग म्हणजे हा लेख पुढे वाचा !



