डब्बा ट्रेडींग म्हणजे काय रे भाऊ?

डब्बा ट्रेडींग म्हणजे काय रे भाऊ?

डब्बा म्हणजे काय ?
डब्बा ही मानसिकता आहे. कायद्याला फाट्यावर मारून केलेला कोणताही सट्टा म्हणजे डब्बा.अधिकृत नियंत्रित बाजाराच्या बाहेर जाऊन केलेला कोणताही व्यवहार म्हणजे डब्बा. उदाहरणार्थ , रेसकोर्सच्या किंवा ऑफ-कोर्स सेंटरच्या बाहेर  घोड्यावर लावलेले पैसे म्हणजे डब्बा. लॉटरी अधिकृत आणि मटका अनधिकृत किंवा लग्नाची बायको आणि ठेवलेली बाई इतकाच काय तो फरक.

 

डब्बा ट्रेडींग म्हणजे काय ?
(सध्या चर्चेत असलेल्या संदर्भाने ) खाजगी, अनधिकृत , शेअरबाजारात शेअरचे केलेले सौदे म्हणजे डब्बा ट्रेडींग.
 

डब्बा ट्रेडींग कधी सुरु झाले?
आधी डब्बा ट्रेडींग सुरु झाले त्यानंतर अधिकृत शेअर बाजार सुरु झाला . म्हणजे साधारण दिडशे वर्षांपूर्वी डब्बा ट्रेडींग सुरु झाले असे मानायला हरकत नाही.


डब्बा ट्रेडींग हा राजरोस चालणारा व्यवहार आहे का ?
होय. जेव्हा बाजार ट्रेडींग हॉलमध्ये चालायचा तेव्हा ट्रेडींग अवर्स मध्ये आणि त्यानंतरही जीजीभाई टॉवर्सच्या मागच्या गल्लीत डब्बा चालत होता . शेअर बाजाराच्या शेजारच्या इमारतीत मधुभाई ठक्करचा डब्बा फेमस होता.आता फक्त माध्यमे बदलली आहेत.
 

डब्ब्यात सामान्य गुंतवणूकदाराची फसवणूक होते का ?
डब्ब्यात गुंतवणूक होत नाही ,फक्त सट्टा होतो. डब्ब्यात सौदा करणारा हा सामान्य गुंतवणुकदार नसतोच. सटोडीयाच असतो. 
 

या व्यवहाराची नोंद कशी ठेवली जाते ?
या व्यवहारात नोंद ठेवली जात नाही. शेअर्सची डिलीव्हरी नसते . फक्त सट्टा असतो. ठरलेली वेळ संपली की बाजार संपला. "रात गयी बात गयी " असे सौदे असतात. पूर्वी पाटीवर खडूने सौदे लिहिले जायचे. "डब्बा चलानेवाला" म्हणजे डब्बा ऑपरेटर  त्यामधून स्वतःचा "कट " काढून व्यवहार पूर्ण होतील याची दक्षता घेतो.


डब्बा ट्रेडींगमध्ये धोका आहे का ? आणि कोणता ?
अनधिकृत सट्टा धोका आहे. अनधिकृत सट्टेबाज धोकेबाज आहेत. डब्बा ऑपरेटर हा मोठा धोका आहे. लिखापढी नसल्याने ज्याची पैसे बुडवण्याची ताकद असेल तो कधीही हात वर करू शकतो. पण हे क्वचितच होते. अधिकृत बाजारात दिवाळं काढणार्‍यांची शक्यता डब्ब्यापेक्षा जास्त आहे.
 

धोका असेल तर डब्बा चालतो कसा ?
लक्षात ठेवा . चोरोंके उसूल होते है ? असा प्रश्न मनात आला सेल तर उत्तर असे आहे की  " चोरोंकेही उसूल होते है" .
 

डब्बा ट्रेडींगमध्ये नुकसान कोणाचे ?
फक्त सरकारचे. कर मिळत नाही. नियंत्रण राहत नाही.


डब्बा बंद करणे शक्य आहे का ? 
अशक्य आहे.  मार्केट ओरीएंटेडच्या जमान्यात डब्बा चालू असणे हे बाजार सशक्त असल्याचे लक्षण आहे.