एल्फिन्स्टन रोड भागात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ‘पूजा विजय खेडेकर’ या पोहे, उपमा, शिरा आणि साबुदाणा खिचडी विकण्याचं काम करतात. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे स्टेशन बाहेरच्या फेरीवाल्यांना हटवण्याचं काम चालू असलं तरी, त्यांचा हा लहान व्यवसाय बंद पडलेला नाही.
कामावर जाण्याच्या घाई गडबडीत मुंबईकरांना नाश्ता काय, पाणी सुद्धा मिळत नाही. अशात रेल्वे स्टेशनच्या बाहेर गरमा-गरम पोहे, साबुदाणा खिचडी मिळाली की दुपारपर्यंतचं इंधन पोटात जातं. पूजा खेडेकर सांगतात त्याप्रमाणे सकाळी नाश्ता न केलेले, तसेच दुपारच्या जेवणाचा डबा न आणलेले असे सगळेच या घरगुती पदार्थांवर दिवस काढतात.
मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही असं म्हटलं जातं> पण हे साफ खोटं आहे. पूजा खेडेकर या गेल्या १० वर्षापासून आपला स्टॉल चालवत आहेत आणि तेही यशस्वीपणे. या यशामागे काही गणितं आहेत,ती आज आपण समजून घेणार आहोत. आधी बघू या लहानशा व्यवसायामागचं अर्थशास्त्र काय आहे....
(खालील आकडे दर दिवसाला लागणाऱ्या साहित्याच्या किंमती आहेत)
बटाटे – ८० रु.
कांदा – १२० रु.
पोहो – ७५० रु.
साबुदाणा – ३००रु.
हळद – २५० रु.
शेंगदाणे – २०० रु.
दुध – ५५ रु.
मोहरी – २० रु.
तेल – ८४० रु.
डालडा – ११० रु.
रवा – २०० रु.
प्लास्टिक पिशव्या – ६० रु.
प्लास्टिकचे चमचे – १० रु.
कागदी प्लेट्स – १० रु.
वर्तमानपत्र – ५० रु.
_____________________
एकूण = ३०५५ रुपये.
ही आहे सामानाची लिस्ट. आता बघू प्रत्येक पदार्थाची किंमत किती आहे.
पोहे – १२ रुपये प्लेट
उपमा - १२ रुपये प्लेट
शिरा – १२ रुपये प्लेट
साबुदाणा खिचडी – २२ रुपये प्लेट
सर्व पदार्थांच्या मिळून दरदिवशी ५०० प्लेट विकल्या जातात. याप्रमाणे एका महिन्याची कमाई झाली १,९५,००० रुपये. दिवसाला होणाऱ्या ३०५५ रुपये खर्चाप्रमाणे महिन्याचे साधारणपणे ८०,००० रुपये खर्च होतात. आता १,९५,००० रुपयांमधून ८०,००० रुपये वजा केल्यास १,१५,००० रुपये मिळतात. म्हणजेच खर्च वजा जाता १,१५,००० पर्यंत नफा मिळतोय.
या लहानशा व्यवसायातून आपलं घर चालवणाऱ्या पूजा खेडेकर या आपल्यासाठी उदाहरण आहेत. पण रेल्वे स्टेशनच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्याचं काम सध्या सुरु आहे, अशावेळी पूजा खेडेकर यांच्यासारख्या स्टॉलवर पोट असणाऱ्या माणसांची नवीन व्यवस्था व्हायला हवी !!
बातमी स्रोत
(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)
©बोभाटा
